मुंबई, दि. 4- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अमेरिकेतील जनतेची मनं जिंकली आहेत. बराक ओबामा यांच्या स्वभावामुळे तसंच त्यांच्या अनेक निर्णयामुळे अमेरिकन जनतेला ते नेहमीच आपलेसे वाटतात. बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा या दोघांना नेहमीच अमेरिकन जनतेकडून प्रेम मिळत असतं. बराक ओबामा यांचं साधं राहणीमान तसंच अमेरिकेतील सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याचा स्वभाव या सगळ्याचं नेहमीत तेथिल लोक कौतुक करतात. तसंच ओबामा कुटुंबियांचे सहलीचे फोटो, सोशल मीडियावरील त्यांचा वावर या गोष्टीही नेहमी चर्चेत असतात. आता बराक ओबामाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रूक अॅलेन या महिलेच्या आईने म्हणजेच लित्झ यांनी मार्च महिन्यात ओबामा दाम्पत्यांना मुलीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पाठवली होती. ओबामा दाम्पत्यांना मुलीच्या लग्नाचं निमंत्रण पाठल्याचं लित्झ विसरूनही गेल्या होत्या. पण पाच एक महिन्यांनंतर ओबामा दाम्पत्यांकडून ब्रूकला पत्र आलं. ओबामा दाम्पत्याकडून आलेलं पत्र पाहून ब्रूकला चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. ब्रूक अॅलेन हिने ते पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.
माझ्या आईने ओबामा दाम्पत्यांना माझ्या लग्नाचं मार्च महिन्यात आमंत्रण पाठवलं होतं. आणि आता मला ओबामा दाम्पत्यांने एक पत्र मेल केलं आहे. असं कॅप्शन ब्रूसने त्या ट्विटला दिलं आहे. 'तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. तुमचा संसार सुखाचा होईल आणि हे नातं अधिक घट्ट होईल अशी आम्ही आशा करतो” असं पत्र ओबामा दाम्पत्यांकडून तिला आलं एवढंच नाही तर या पत्राच्या खाली या दोघांची सही केली आहे. आतापर्यंत मिळालेली ही सुंदर भेटवस्तू होती अशी प्रतिक्रिया ब्रूस हिने दिली आहे. ब्रूक हिच्या या ट्विटला अनेकांनी रिट्विट करत त्यांचा अनुभवही शेअऱ केला आहे. तसंच ओबामा दाम्पत्यांनी पाठविलेल्या या पत्राचं अनेकांनी कौतुकही केलं आहे.