- ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 7 - पोकेमॉनचा जगभरात असलेला क्रेझ अजूनही तितकाच कायम आहे. रस्त्यावर, घरात, कुठेही पोकेमॉन खेळताना अनेकजण दिसतात. अशाचप्रकारे चर्चमध्ये पोकेमॉन खेळल्यामुळे रशियामधील युट्यूब स्टार म्हणून ओळखल्या जाणा-या 21 वर्षीय रुस्लान सोकोलोव्स्कीला पोलिसांनी अटक केली आहे. दोन महिन्यांसाठी त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. इतकंच नाही तर त्याला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
रुस्लान सोकोलोव्स्कीने चर्चमध्ये पोकेमॉन खेळतानाचा एक व्हिडिओ तयार केला आहे. या व्हिडिओला लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. या व्हिडिओच्या आधारे रुस्लान सोकोलोव्स्कीवर द्वेषभाव पसरवल्याचा आणि धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
11 ऑगस्टला पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला 10 लाखांहून जास्त लोकांनी आतापर्यत पाहिलं आहे. स्मार्टफोन घेऊन चर्चमध्ये जाण्याने कोणाचा कसा काय अपमान होऊ शकतो ? असा सवाल रुस्लान सोकोलोव्स्कीने विचारला आहे. 'मी चर्चमध्ये जाऊन काही पोकेमॉन पकडण्याचा निर्णय घेतला होता. सुरक्षित आणि कायद्याला अनुसरुन मी करत आहे हे मला माहित होतं,' असं रुस्लान सोकोलोव्स्कीने सांगितलं आहे.
रुस्लान सोकोलोव्स्कीला सध्या दोन महिन्यांसाठी अटक करण्यात आली आहे. मात्र ही शिक्षा पाच वर्षापर्यंत वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
युट्यूबवर तीन लाखांहूनही जास्त फॉलोअर्स असणा-या रुस्लान सोकोलोव्स्कीने याअगोदरही अशा प्रकारचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. रुस्लान सोकोलोव्स्कीच्या अटकेनंकर ट्विटरवर अनेकांनी #FreeSokolvsky समर्थनार्थ मोहिम सुरु केली आहे. विशेष म्हणजे याअगोदरही 2012 मध्ये दोन तरुणींना अशाच आरोपांमध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.