ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 14 - जर तुम्हाला पोकेमॉन गो खेळण्याचं वेड असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एका सर्व्हेनुसार पोकेमॉन गो खेळण्याने आयुष्य 41 दिवसांनी वाढतं. पोकेमॉन गो खेळताना झालेल्या अपघाताच्या अनेक घटना याअगोदर समोर आल्या आहेत. त्यामुळे हा खेळ किती धोकादायक असू शकतो याची कल्पना आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीकोनातून पोकेमॉन गो खेळण्याचा फायदाही आहे.
पोकेमॉन गो खेळताना पोकेमॉनला शोधून पकडावं लागतं. या नादात अनेकजण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सर्व्हेनुसार पोकेमॉन खेळताना शारिरीक हालचाल होते ज्याचा फायदा आरोग्याला होतो आणि पर्यायाने आयुष्य वाढण्यास मदत मिळते.
अमेरिकेतील स्टॅनफर्डी विद्यापीठ आणि मायक्रॉसॉफ्टच्या संशोधकांनी हा सर्व्हे केला आहे. पोकेमॉन गो खेळणारे रोजच्यापेक्षा 1473 पावलं जास्त चालल्याचं सर्व्हेत समोर आलं आहे. सर्व्हेनुसार 15 ते 49 वयोगटातील लोक जर रोज 1000 पावलं जास्त चालले तर त्यांचं आयुष्य 41 दिवसांनी वाढू शकतं.
या सर्व्हेसाठी 32 हजार पोकेमॉन खेळाडूंवर 3 महिने लक्ष ठेवण्यात आलं होतं. या खेळामुळे त्यांची शारिरीक हालचाल वाढत असल्याचं लक्षात आलं. जे लोक रोजच्या आयुष्यात अॅक्टिव्ह नसतात त्यांनी पोकेमॉन खेळण्यास सुरुवात केल्यानंतर तब्बेतीत सुधारणा होते. अॅक्टिव्ह आणि निरोगी लोकांसोबत अॅक्टिव्ह नसणा-या आणि लठ्ठ लोकांनाही या गेममुळे फायदा पोहोचत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.
आरोग्यासंबंधी अॅप्सपेक्षा पोकेमॉन जास्त प्रभावी असल्याचंही सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. पोकेमॉन गेमिंग अॅपने कमी अॅक्टिव्ह असणा-यांकडून आरोग्यासंबंधी अॅप्सच्या तुलनेत जास्त मेहनत करवून घेतली.