अमेरिका - नव वर्षाच्या सुरुवातीला एका हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर तेथील वेट्रेसला २०२० डॉलर टिप दिली आहे. २०२० डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार जवळपास १ लाख ४० हजार रुपये. हॉलिवूड गायक आणि अभिनेता डॉनी वॉलबर्ग याने ही टिप दिली आहे. डॉनीची पत्नी जेनी हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोनुसार डॉनीचे हॉटेलमध्ये जेवणाचे ७८ डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार ५६०० रुपये इतके बिल झाले होते.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार हा सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या २०२० टिप चॅलेंजचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. या चॅलेंजमध्ये जेवण वाढणाऱ्या व्यक्तीला नवीन वर्षाच्या आकड्याची टिप देण्यात येते. २०१८ मध्ये या चॅलेंजचे प्रचंड क्रेझ पाहायला मिळाली होती. डॉनीने दिलेली ही टिप सध्या सोशल मीडियावर सुरु असलेल्या २०२० टिप चॅलेंजचाच एक भाग असल्याचे चर्चा आहे. डॉनीने ट्विट करत कोणत्याही प्रकारचा दयाभाव नेहमीच अचूक आहे. त्यात दयाभाव किती मोठा, किती छोटा हे महत्वाचे नाही असे लिहून हॉटेलच्या बिलाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
डॉनी आपल्या पत्नीसह नव वर्षाचे स्वागत करत आनंद साजरा करण्यासाठी सेंट चार्ल्स येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. दोघांचे ५६०० हजार रुपयांचे बिल झाले आणि त्यांनी तेथील डॅनिली फ्रांझोनी नावाच्या वेट्रेसला १ लाख ४० हजारांची टिप दिली आहे. जोडप्याने बिल देताना बिलावर नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा असे लिहिले. त्यांनी हा फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. मोठी रक्कम टिप म्हणून मिळाल्यानंतर वेट्रेस फ्रांजोनीला आनंद झाला आहे. बेघर असलेल्या सिंगल मॉम असलेल्या फ्रांजोनीने या पैशाचा विनियोग भविष्य घडविण्यासाठी करणार असल्याचे म्हटले आहे.