सिंगापूर- कच्च्या तेलाच्या दरांमध्ये आज एक टक्क्याने आणखी वाढ झाली असून त्यामुळे नोव्हेंबर 2014 नंतर प्रथमच तेलाचे दर इतके महागले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सुरु असलेला तणाव, व्हेनेझुएलाचे मोडलेले कंबरडे यामुळे हे दर वाढल्याचे सांगण्यात येते. कच्च्या तेलाचे दर आता 75.57 डॉलर्स प्रतीबॅरल झाले आहेत. नोव्हेंबर 2014मध्ये हे दर 75.89 प्रतीबॅरल होते.व्हेनेझुएलामधील अस्थिरतेमुळे तेथिल तेलाच्या उत्पादन आणि निर्यातीवर परिणाम होऊन तेलाचे दर भडकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. व्हेनेझुएलाचे तेलउत्पादन वर्ष 2000 च्या तुलनेत निम्म्यावर म्हणजे प्रतिदिन 15 लाख बॅरलवर आले आहे.इराणने अणूकार्यक्रम आटोपता घेण्याचे संकेत दिल्यानंतर अमेरिकेने इराणवरील निर्बंध शिथिल केले. त्यामुळे 2016 पासून इराणने तेलाची निर्यात वाढवली. मात्र इराणच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका येताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी कडक पावले उचलण्याचे निश्चित केले. 2015 सालच्या करारातून आपण माघार घेऊ असे स्पष्ट संकेत ट्रम्प यांनी दिले. असे झाल्यास इराणकडून होणारी निर्यात पुन्हा घटेल आणि दरांमध्ये वाढ होईल.
कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले; इराण, व्हेनेझुएलामुळे परिस्थिती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2018 3:13 PM