सिएरा लियोन - आफ्रिकन देश सिएरा लियोनमध्ये तेल टँकरमध्ये भीषण स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेमध्ये किमान ९१ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी फ्रिटाऊनमध्ये घडली आहे. ४० फूट लांबीचा तेलाचा टँकर अन्य वाहनावर आदळून हा अपघात झाला. त्यानंतर मोठा स्फोट होऊन आजूबाजूच्या परिसरात हाहाकार माजला. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ स्थानिक प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये टँकरच्या आजूबाजूला मृतदेह विखुरलेले दिसत आहेत.
महापौर यावोन अकी-सॉयर यांनी व्हिडीओ पाहिल्यानंतर या घटनेचा उल्लेख भयानक असा केला आहे. त्यांनी सांगितले की, या दुर्घटनेत नेमकं किती नुकसान झालं आहे, हे आताच सांगणे कठीण आहे. एका फेसबुक पोस्टमध्ये महापौरांनी सांगितले की १०० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी अफवा आहे. मात्र मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच मदत आणि बचाव कार्य सुरू झाले आहे. जखमींना रुग्णालयात पोहोचवले जात आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्यातरी दुर्घटनेमध्ये ९१ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मात्र सध्यातरी आम्ही याला दुजोरा देत नाही सिएरा लियोनच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण एजन्सीचे प्रमुख ब्रिमा ब्युरेह सेसे यांना स्थानिक माध्यमांना सांगितले की, ही एक भयावह दुर्घटना आहे. त्यांनी सांगितले की, या भागात १० हजार लोक राहतात. सध्या किती लोक या दुर्घटनेमुळे प्रभावित झाले आहेत,याबाबत स्पष्टपणे काही सांगता येणार नाही.