वॉशिंग्टन - आपल्या ग्रहमालेतील गुरू हा ग्रह केवळ आकारानेच नव्हे, तर वयानेही इतर ग्रहांहून मोठा आहे, असे वैज्ञानिकांचे म्हणणे असून सूर्यानंतर ४० लाख वर्षांच्या आत हा प्रचंड आकाराचा वायूरूप ग्रह जन्माला आला असावा, असा त्यांनी हिशेब मांडला आहे.ग्रहमाला तयार होऊन ती सध्याच्या रचनेपर्यंत कशी विकसित झाली हे समजण्यासाठी गुरू ग्रहाचे वय जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ग्रहमाला तयार होत असताना गुरू ग्रह तुलनेने लवकर तयार झाला, असा ढोबळ अंदाज यापूर्वीच्या मॉडेलवरून करण्यात आला होता, तरी गुरूच्या जन्माचा नेमका कालखंड कधी ठरविला गेला नव्हता.अमेरिकेतील लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांच्या चमूने आता नव्या अभ्यासातून गुरूचे नेमके वय ठरविले असून त्यांचा हा शोधप्रबंध ‘प्रोसीडिंग्ज आॅफ दि नॅशनल अॅकॅडमी आॅफ सायन्सेस’ या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.या संशोधनातून वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, ग्रहमाला उदयास आल्यानंतर पहिल्या १० लाख वर्षांत गुरू ग्रहाचा गाभा पृथ्वीहून वीसपट एवढ्या आकारमानाचा झाला. त्यानंतर आणखी २० ते ३० लाख वर्षे या गाभ्याचे आकारमान वाढत राहिले व तो वाढून पृथ्वीहून ५० पट एवढ्या वस्तुमानाचा झाला.आधीचे सिद्धान्त असे मानत होते की, गुरू आणि शनी यांसारख्या प्रचंड आकाराच्या वायूरूप ग्रहांची रचना होताना आधी त्यांचा पृथ्वीहून दसपट ते वीसपट आकाराचा घनरूप गाभा तयार झाला व त्यानंतर या गाभ्यावर वायूचे आवरण चढत गेले.या वैज्ञानिक चमूचे प्रमुख थॉमस क्रुईजर यांनी सांगितले की, आमचा निष्कर्षही या प्रस्थापित सिद्धान्ताच्या अनुरूपच आहे. त्यानुसार गुरू हा आपल्या ग्रहमालेतील वयाने सर्वांत मोठा ग्रह आहे व सौर नेब्युलाच्या वायुमंडलाचे विघटन होण्याआधीच या ग्रहाचा घनरूप गाभा तयार झाला होता.या प्रयोगात वैज्ञानिकांनी उल्कांचे आयसोटोप विश्लेषण करून असा निष्कर्ष काढला की, आपल्या सूर्याची ग्रहमाला तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतरच्या पहिल्या सुमारे १० लाख वर्षांतच गुरूचा घनरूप गाभा तयार झाला होता. यावरून तो ग्रहमालेतील सर्वांत आधी तयार झालेला ग्रह ठरतो.नेमका कसा काढला निष्कर्ष?प्रा. क्रुईजर म्हणाले की, गुरूचे नेमके वय ठरविण्यासाठी आमच्याकडे तेथून आणलेल्या मातीचे कोणतेही नमुने नव्हते. त्यामुळे आम्ही उल्कांवरील आयसोटोपचा अभ्यास केला. त्यात लोहउल्कांवर टंगस्टन व मॉलिबडेनम या दोन स्वतंत्र मूलद्रव्यांचे आयसोटोप आढळले. त्यावरून या उल्कांची रचना सौर नेब्युलातील दोन स्वतंत्र स्रोतांतून आलेल्या घटकांपासून झाल्याचे स्पष्ट झाले. हे दोन्ही घटक नेब्युलामध्ये एकाच वेळी तयार झाले असले तरी ग्रहमालेच्या निर्मितीनंतर ३० ते ४० लाख वर्षांपर्यंत ते एकमेकांपासून वेगळे राहिले. गुरू ग्रह तयार झाल्याने असे झाले असावे. गुरूच्या रूपाने वाटेत अडथळा निर्माण झाल्याने नेब्युलातील घटकद्रव्ये सूर्यमंडलात विखुरण्यात खंड पडला. (वृत्तसंस्था)
वयानेही सर्वांत मोठा गुरू
By admin | Published: June 16, 2017 3:51 AM