ऑनलाइन लोकमत
मनिला, दि. 21 - इस्लामिक दहशतवाद्यानी शाळेतील विद्यार्थ्यांना ओलीस धरल्याने सुरू झालेले अोलीस नाट्य आता समाप्त झाले आहे. इस्लामिक दहशतवाद्यांनी शाळेवर ताबा मिळवत विद्यार्थ्यांना ओलीस धरले होते. मात्र काही वेळातच दहशतवादी तिथून निघून गेल्याने हे ओलीसनाट्य संपले आहे.
गेल्या काही काळापासून इस्लामिक दहशतवाद्यांनी फिलिपिन्समध्ये कारवाया वाढवल्या आहेत. दरम्यान आज दक्षिण फिलिपिन्समधील पिगकावायन शहरात काही बंदुकधारी व्यक्तींनी शाळेवर हल्ला केला होता. त्यांनी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले होते. हे हल्लेखोर बंगसामोरे इस्लामिक फ्रीडम फायटर्स (बीआयएफएफ) या दहशतवादी संघटनेशी निगडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
मात्र या अपहरणकर्त्या हल्लेखोरांवर लष्करी कारवाई सुरू झाल्यावर अपहरणकर्त्यांनी शाळेच्या परिसरातून माघार घेतली. या घटनेबाबत माहिती देताना ब्रिगेडियर जनरल रेस्टीटुटो पेडिल्ला म्हणाले, " हे अपहरण नाट्य संपुष्टात आले आहे. अपहरणकर्ते दहशतवादी शाळेचा परिसर सोडून गेले आहेत. आता कुणीही दहशतवादी शाळेच्या परिसरात उपस्थित नाही. शाळेचा परिसर पुन्हा एकदा सुरक्षित झाला आहे." दहशतवाद्यांच्या ताब्यात विद्यार्थी नाहीत. मात्र ओलीस ठेवण्यात आलेले पाच नागरिक दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत का याची माहिती घेण्यात येत आहे.