Oman Oil Tanker Capsizes : ओमानच्या किनारपट्टीवर मोठी दुर्घटना घडली. ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्याने १३ भारतीयांसह १६ जणांचा संपूर्ण क्रू समुद्रात बेपत्ता झाला. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत भारतीयांसह इतर लोकांचा अद्याप शोध लागलेला नाही. १३ भारतीयांसोबतच ३ श्रीलंकन नागरिकांचाही समावेश होता. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु करण्यात आलं आहे. प्रेस्टिज फाल्कन असे बुडालेल्या ऑईल टँकरचे नाव आहे.
ओमानच्या किनारपट्टीवर बुडालेल्या ऑईल टँकरवर आफ्रिकेच्या कोमोरोस देशाचा झेंडा होता. ऑईल टँकरमधील १६ क्रू मेंबर्स अद्याप बेपत्ता आहेत. ऑईल टँकर बुडाल्यानंतर सागरी सुरक्षा केंद्राने (एमएससी) मंगळवारी ही माहिती दिली. कोमोरोस-ध्वज असलेला ऑईल टँकर रास मदारकाच्या आग्नेयेस २५ नॉटिकल मैल दूर असलेल्या बंदर शहराजवळ पलटल्याचे एमएससीने म्हटले आहे. ऑईल टँकर जहाजाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, घटना उघडकीस आली तेव्हा जहाज पाण्यात बुडून उलटे झाले होते. जहाजातून तेल किंवा तेल उत्पादने समुद्रात गळती होत आहेत की नाही किंवा जहाज उलटल्यानंतर सरळ झाले आहे की नाही याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, ऑईल टँकरचा चालक अद्याप बेपत्ता असल्याचे एमएससीने सांगितले. त्यांचा शोध सुरू आहे. हे जहाज येमेनच्या दिशेने जात असताना डुक्म बंदराजवळ ते उलटले. शिपिंग डेटानुसार हे जहाज २००७ मध्ये बांधलेले ११७ मीटर लांबीचा तेल वाहून नेणारा टँकर आहे. अशा लहान टँकरचा वापर सामान्यत: लहान किनारपट्टीवरील प्रवासासाठी केला जातो.
ओमानच्या नैऋत्य किनाऱ्यावर वसलेले डुक्म बंदर सल्तनतच्या महत्त्वपूर्ण तेल आणि वायू उत्खननाच्या ठिकाणांजवळ आहे. यामध्ये ओमानमधील सर्वात मोठा आर्थिक प्रकल्प असलेल्या डुक्ममधील एका प्रमुख तेल रिफायनरीचा देखील समावेश आहे.