मस्कतः ओमानच्या राजकुमारीच्या नावे ट्विटरवर बनावट अकाऊंट उघडण्यात आलं असून, सोशल मीडियावरून या बनावट ट्विटर अकाऊंटवरून भारताबद्दल यथेच्छ गरळ ओकली आहे. त्यामुळे ओमानच्या राजकुमारी भारतीयांच्या निशाण्यावर आल्या आहेत. भारतातील मुस्लिमांचा छळ थांबला नाही, तर इथं काम करणार्या दहा लाख भारतीयांना परत पाठवण्यात येईल, असं ट्विट त्या बनावट खात्यावरून करण्यात आलं होतं. पाकिस्तानमध्ये हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी हे ट्विट पुन्हा रिट्विट करून भारताला लक्ष्य केले. पण हे ट्विटर अकाऊंट बनावट असल्याचं खातरजमा त्यांनी केलेली नाही. ओमानची राजकन्या मोना बिंट फहद अल सैद यांच्या नावे बनावट ट्विटर खातं उघडण्यात आलं होतं. त्या ट्विटरवर सक्रिय नाहीत. ओमान भारतातील आपल्या मुस्लिम बांधवांसह कायम उभा आहे. जर भारत सरकारने मुस्लिमांचा छळ थांबविला नाही, तर ओमानमध्ये राहणा-या 10 लाख भारतीयांना मायदेशात परत पाठवू. ओमानच्या सुलतानांसमोर मी हा मुद्दा नक्की उपस्थित करेन, असंसुद्धा ट्विटमध्ये म्हटलं आहे. राजकुमारीच्या नावे चालवलेल्या या बनावट ट्विट अकाउंटद्वारे RSSलाही लक्ष्य करण्यात आले होते. पाकिस्तानमध्ये हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं असून, ओमानची प्रशंसा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी यूएईच्या राजकन्येने संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणा-या भारतीयांना इस्लामोफोबिया पसरू नये, असा इशारा दिला होता. यामुळे ओमानच्या राजकुमारीच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट उघडून करण्यात आलेल्या ट्विटला सत्य समजण्यात आले. पाकिस्तानचे सुप्रसिद्ध पत्रकार हमीद मीर यांनी त्या ट्विटर खात्यावरील ट्विट रिट्वीट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतर देशांमध्ये काम करणा-या भारतीयांसाठी समस्या निर्माण करीत आहेत. ओमान राजकुमारीच्या ट्विटवरून नरेंद्र मोदींच्या मुस्लिमविरोधी धोरणांविरोधात तीव्र संताप वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मध्य-पूर्वेतील हे भारतातील मित्र देश त्यांच्या संबंधांवर पुनर्विचार करतील, असंही पत्रकार हमीद मीर म्हणाले आहेत. हमीद मीर यांच्या या ट्विटला पाकिस्तानी लोकांनी डोक्यावर घेतलं असून, मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं आहे. पाकिस्तानातल्या एका युजर्सनं लिहिले आहे की, "भारतीय मुसलमानांसोबत आल्याबद्दल धन्यवाद ओमानच्या राजकुमारी." हमीद मीर यांच्या या ट्विटला भारतीयांनी लक्ष्य केलं आहे. भारतातल्या अनेक युजर्सनी पाकिस्तानला बलुचिस्तानमधील मुस्लिमांवर होणार्या अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना जोरदार ट्विटर युद्ध रंगल्याचं दिसलं. ओमान हा मध्य पूर्वातील सर्वात तटस्थ देश मानला जातो. हे कोणाच्या गोटात नाहीत. परंतु मध्यपूर्वेत रशिया आणि अमेरिकेचे वर्चस्व असल्यानं दोन्ही देशांबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यांचे इराणशी तसेच सौदी अरेबियाशीही चांगले संबंध आहेत.