आजपर्यंत चक्रीवादळाने आणि जोरदार पावसाने वीज गेल्याचे आपण ऐकले आहे. मात्र आता एका सांडामुळे वीज गायब झाली आहे, वाचून थोडे चक्रावले आहात ना. पण हे खरं आहे. स्कॉडलँडमध्ये हा आगळावेगळा प्रकार घडला असून, बीबीसीने याबाबतचे वृत्त दिले आहे. सांडाचे नाव रॉन आहे. रॉन हा चार वर्षांचा आहे. रॉन मोकळ्या जागेत फिरत होता. त्यानं विजेच्या खांबावर पाठ घासायला सुरुवात केली.
विजेच्या ताराला अशा प्रकारे जोराने हलवल्याने ट्रान्सफॉर्मर बॉक्स तुटला. त्यामुळे गावातील 800 घरांची वीजच गायब झाली. विशेष म्हणजे त्या खांबावर 11,000 वॉल्टच्या वायर होत्या. विजेचा खांबाला स्पर्श करणे हे खूप घातक ठरू शकले असते. तरीही रॉन त्यातून बचावला. विशेष म्हणजे त्याला विजेचा झटकाच लागला नाही हे मोठे आश्चर्यचकित करणारे आहे.
एका गावक-याने हा सर्व किस्सा पाहिला. ही व्यक्ती त्यावेळी शेतातील गायींना खायला घालत होती. त्यावेळी ही घटना घडली, शेतातील अनेक ताराही तुटल्या होत्या. रॉनमुळे परिसरातील वीज गेल्याने संपूर्ण रात्र गावक-यांना अंधारातच काढावी लागली. लोक मोठ्या अडचणीत सापडले होते. अभियंते आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विजेचा खांब दुरुस्त केला आणि वीजपुरवठा सुरळीत केला. घडलेला प्रकार ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले की, एका सांडामुळे इतके मोठे नुकसान झाले आहे.