रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा राईटहँड आणि युक्रेनी हल्ल्यामागचे डोके समजले जाणारा अलेक्झांडर डुगिन यांच्या डोळ्यांदेखतच त्यांच्या मुलीला कारमध्ये बॉम्बने उडविण्यात आले. हा प्रकार बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये जसा दाखवला जातो, तसाच कार स्टार्ट करत असताना झाला. खरेतर अलेक्झांडरलाच मारण्याचा प्लॅन होता, परंतू ऐनवेळी त्याने कार बदलली आणि त्याची मुलगी मारली गेली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सहकाऱ्यांना धक्के बसू लागले आहेत. युक्रेन युद्धात अनेक सहकारी कमांडर मारले गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच युक्रेन युद्धासाठी महत्वाचा असा एअरबेसच उडवून दिल्याने रशियन सैन्याला मोठा धक्का बसला आहे. असे असताना आता पुतीन यांचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या मुत्सद्दीच्या मुलीची कार बॉम्बने उडवून देत हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अलेक्झांडरनेच युक्रेन युद्धाचा प्लॅन तयार केला होता. त्याला पुतीन यांचा अध्यात्मिक गुरु मानले जातेय. डुगिन यांचा मित्र पीटर लुंडस्ट्रेमने कार बॉम्बने उडविली तेव्हा काय घडले, याचा खुलासा केला आहे. अलेक्झांडर आणि त्याची मुलगी डारिया ही मॉस्कोच्या बाहेर असलेल्या एका कौटुंबीक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. इथून दोघेही एकत्रच निघणार होते. मात्र अलेक्झांडर यांनी प्लॅन बदलला आणि ते दुसऱ्या गाडीत बसले. डारियाने टोयोटा लँड क्रूझर सुरु केली आणि क्षणार्धात ती आगीच्या लाटांनी वेढली गेली. अलेक्झांडर देखील तिथेच होते, त्यांनी डारियाची कार बॉम्बने उडवून दिल्याचे पाहिले आणि डोक्यावर हात धरला, असे फोटो आले आहेत. त्यांच्या पायाखाली रस्त्यावर डारियाचा छिन्नविछिन्न मृतदेह होता.
स्वयंघोषित डोनेस्तक पीपल्स रिपब्लिकचे नेते डेनिस पुसिलिन यांनी दावा केला आहे की हल्ल्याचे खरे लक्ष्य अलेक्झांडर डुगिन होते. युक्रेन समर्थित अतिरेक्यांवर हल्ल्याचा आरोप केला आहे.