जगभरात ओमायक्रॉन घातक असल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञच नाहीत तर डब्ल्यूएचओने देखील ओमायक्रॉनला गंभीरतेने घेतले आहे. मात्र, असे काही तज्ज्ञ आहेत ते सुरुवातीपासून ओमायक्रॉन धोकादायक नसल्याचे गळा फाडून सांगत आहेत. त्या पैकीच एक आहेत ते अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे. गोडसेंनी सुरुवातीपासून ओमायक्रॉन काहीही करू शकत नाही, हे वारंवार सांगितले आहे.
डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉन संसर्गाच्या आजाराचे स्वरुप सौम्य आहे. त्यामुळे ओमायक्रॉनची लाट वाढत असल्यास डेल्टासारखा घातक विषाणू मागे टाकला जाईल, असे निरीक्षण असल्याची माहिती संसर्गजन्य रोग विशेषज्ज्ञ आणि राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. वसंत नागवेकर यांनी दिली. असेच मत आता अनेक तज्ज्ञ व्यक्त करू लागले आहेत.
रवी गोडसेंनी काही दिवसांपूर्वीच ओमायक्रॉन म्हणजे नॉनसेंस! असे ट्विट केले होते. आता त्यांनी ओमायक्रॉन ही वाईट बातमी! असे ट्विट केले आहे. परंतू ही वाईट बातमी आपल्या कोणासाठी नसून ती डेल्टासाठी आहे. असे ते म्हणत आहेत.
कोरोनाची पहिली लाट, दुसरी लाट संपविण्यासाठी काय करावे लागेल याविषयी, कोरोनाची लागण कशी होते, काय लक्षणे आहेत, कसे बरे होता येईल आदी अनेक विषयांवर डॉ. रवी गोडसे गेल्या दोन वर्षांपासून मार्गदर्शन करत आहेत. कोरोनाची लस का घ्यावी, काय परिणाम होईल आदीची देखील त्यांनी वेळोवेळी माहिती दिली आहे. रवी गोडसे यांनी २२ डिसेंबरला एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट येणार नाही, कारण ओमायक्रॉन हा मोठा झिरो ठरणार आहे, म्हणजेच काहीच होणार नाही, असे गोडसे यांनी म्हटले होते. कोरोनाच्या आधीच्या व्हेरिअंटला गंभीरतेने घेणारे गोडसे यांनी ओमायक्रॉनला सुरुवातीपासून हलक्यात घेतले आहे. ओमायक्रॉन हा शक्तीहीन व्हायरसचा व्हेरिअंट असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांचीच री अन्य तज्ज्ञ ओढू लागले आहेत.
ओमायक्रॉन हा मानवजातीसाठी नाही तर डेल्टासाठी धोक्याचा असल्याचे मत रवी गोडसेंनी मांडले आहे. ओमाक्रॉनमुळे डेल्टा व्हायरस मागे पडू शकतो, असे ते म्हणत आहेत. हे कोरोनाचा व्हायरस संपण्यासाठी चांगले आहे, असे गोडसेंना म्हणायचे आहे.
सर्जिकल मास्क वापरा, दुहेरी मास्किंग कराकोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका असताना ‘दुहेरी मास्क’ वापरणे योग्यच असून संसर्ग दूर ठेवण्याचा हा योग्य मार्ग आहे. कारण अनेक मास्क चेहऱ्यावर योग्यरीत्या बसत नाहीत. अशावेळी दोन मास्क वापरल्याने संसर्गाची शक्यता कमी करता येईल. यामुळे ओमायक्रॉन कमी गंभीर असला तरी प्रत्येकाने काळजी घेण्याची, कोरोना नियम पाळण्याची आणि लसीकरण करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.