कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिअंट ओमीक्रॉनची व्याप्ती आता 11 हून अधिक देशांत वाढली आहे. तज्ज्ञांनुसार हा व्हायरस डेल्टा व्हेरिअंटपेक्षाही जास्त खतरनाक आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील हा व्हायरस धोकादायक असल्याचे म्हटले आहे. जिथे डेल्टाचे दोन म्युटेशन झाले होते, तिथे ओमीक्रॉनचे 30 हून अधिक म्युटेशन समोर आले आहेत. (Corona New Variant Omicron spread in 11 Countries.)
ओमीक्रॉनने जगासोबत शास्त्रज्ञांच्याही चिंता वाढविल्या आहेत. पहिल्यांदा आफ्रिकेत हा व्हेरिअंट 24 नोव्हेंबरला सापडला होता. त्यानंतर 26 नोव्हेंबरला हा व्हेरिअंट 5 देशांमध्ये पसरला होता. तर 28 तारखेला म्हणजेच आजपर्यंत ओमिक्रॉन व्हेरिअंट 11 देशांमध्ये पसरला आहे. काही वैज्ञानिकांनुसार हा व्हेरिअंट या 11 देशांतच नाही तर आणखी डझनभर देशांत पोहोचला आहे. याचे रुग्ण हळू हळू समोर येऊ लागतील. यामुळे या व्हेरिअंटचा कहर आणखी काही देशांमध्ये दिसू लागण्याची शक्यता आहे.
ओमिक्रॉन प्रकार आतापर्यंत आफ्रिकेपासून युरोपपर्यंतच्या देशांमध्ये आढळला आहे. बोत्सवानामध्ये पहिल्यांदा हा व्हेरिअंट लक्षात आला. परंतु पहिला रुग्ण शोधणारा देश हा दक्षिण आफ्रिका होता. इतर देशांनी नवीन प्रकाराबद्दल प्रवास निर्बंध किंवा चेतावणी जारी करण्यापूर्वी हा व्हेरिएंट यूके, बेल्जियम, जर्मनी, इस्रायल, झेक प्रजासत्ताक, इटली, हाँगकाँग आणि ऑस्ट्रेलियामध्ये पसरला आहे. नेदरलँड्समध्ये याच्याशी संबंधित दोन रुग्णांची अद्याप पुष्टी झालेली नाही.
भारताला किती धोका?ज्या देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंट सापडला आहे, त्यापैकी भारताने हवाई बबल अंतर्गत विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी तीन देशांशी करार केले आहेत. हे देश ब्रिटन, जर्मनी आणि नेदरलँड्स आहेत. अशा परिस्थितीत भारतातून या तिन्ही देशांच्या उड्डाणांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. केंद्र सरकारने नुकतीच घोषणा केली होती की 15 डिसेंबरपासून सर्व देशांसोबत विमानसेवा पूर्ववत केली जाईल, परंतु पंतप्रधान मोदींनी एक दिवसापूर्वी कोरोनावरील उच्चस्तरीय बैठकीनंतर या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे सांगितले आहे.