नवी दिल्ली – जगभरातील अनेक देशांत पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दक्षिण कोरियात तर एकाच दिवसाला ४ लाख रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. कोरोना महामारीवर(Coronavirus) नियंत्रण मिळवण्यात यश येत असल्याचं वाटत असतानाच पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या(WHO) तंत्रज्ञान प्रमुख मारिया वैन कारखेव(Maria Van Kerkhove) यांनी कोरोनाशी निगडीत ३ चुकीचे फॅक्ट्स सांगितले आहेत.
एका पत्रकार परिषदेत मारिया वैन कारखेव म्हणाल्या की, आमच्याकडे कोरोना महामारीबद्दल चुकीच्या अफवा पसरल्याची माहिती आली आहे. ३ चुकीच्या अफवांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. यातील पहिलं म्हणजे कोविड १९ महामारी संपुष्टात आली आहे. दुसरी ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंट काही गंभीर नाही आणि तिसरं म्हणजे कोरोनाचा हा शेवटचा व्हेरिएंट होता असं कारखेव यांनी सांगितले.
WHO नुसार, कोविड १९ महामारीत जगभरात मागील आठवड्यात कमी चाचणी झाली तरी ११ मिलियनपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. नव्या कोरोना रुग्णसंख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. BA.2 आतापर्यंतचा सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हेरिएंट असल्याचं आढळलं आहे. लोकसंख्येच्या स्तरावर BA.1 पेक्षा BA.2 मध्ये गंभीरता कमी आहे. अधिकांश हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसेल. तेच वाढलेल्या मृत्यूचं कारण बनेल असं कारखेव यांनी म्हटलं आहे.
चिंता वाढली, पण भारताला थोडा दिलासा
ओमायक्रॉन या सब व्हेरिएंटमुळे युनायटेड किंगडम आणि इतर युरोपीय देशांमध्ये भीती निर्माण होत आहे. मात्र, भारतातील या सब व्हेरिएंट संबंधित धोक्याबद्दल आरोग्य तज्ज्ञ फारसे चिंतित नाहीत. याचे सर्वात मोठे कारण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाढलेली प्रतिकारशक्ती असल्याचे सांगितले जात आहे.भारतात गेल्या वर्षी डिसेंबर ते या वर्षी फेब्रुवारी दरम्यान, अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढला होता.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरस ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळून आला होता. या व्हेरिएंटमध्ये ५० हून अधिक म्यूटेशन होते. दरम्यान, सुरुवातीला हा व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य असल्याने भीती निर्माण झाली, परंतु नंतर गंभीर आजार, रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले. अलीकडे कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने लोकांमधील भितीच वातावरण संपलेले आहे. परंतु तेच पाहता WHO नं लोकांना सतर्क राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.