मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉननं जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटन, अमेरिकेत ओमायक्रॉननं हाहाकार माजवला आहे. भारतात २ डिसेंबरला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. सध्याच्या घडीला देशातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १५० च्या पुढे गेला आहे. तर राज्यातील बाधितांचा आकड्यानं पन्नाशी पार केली आहे.
ओमायक्रॉन विरोधात लस प्रभावी ठरते का, असल्यास ती कितपत प्रभावी ठरते, असे प्रश्न जगभरातील लोकांना पडले आहेत. याबद्दलच्या प्राथमिक संशोधनातून चिंताजनक माहिती समोर आली आहे. कोविशील्डसह जवळपास सर्वच लसी नव्या व्हेरिएंटविरोधात अपयशी ठरत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, बहुतांश लसी ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर प्रकृती गंभीर होण्यापासून बचाव करत आहेत. मात्र या लसी संक्रमण रोखण्यात कमी पडत आहेत. संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लसींचे बूस्टर डोस देण्यात आल्यानंतर ओमायक्रॉनला रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचं दिसत आहे.
ऍस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सनसह चीन आणि रशियामध्ये तयार करण्यात आलेल्या लसी ओमायक्रॉनला रोखण्यात अपयशी ठरल्या आहेत. जगभरातील अनेकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. त्यामुळे संक्रमण वेगानं वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली.