नवी दिल्ली: गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. देशात दररोज जवळपास दीड लाख नव्या रुग्णांची नोंद होत आहे. मृतांचा आकडा ५ लाखांपर्यंत पोहोचला आहे. मात्र तरीही संकट संपलेलं नाही. कोरोनाचे नवे व्हेरिएंट चिंता वाढवत आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली. तर ओमायक्रॉनमुळे तिसरी लाट आली. आता ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दलची नवी माहिती समोर आली आहे.
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची उत्पत्ती उंदरांमधून झाली असावी अशी शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. कोरोना विषाणू माणसांमधून उंदरांपर्यंत पोहोचला आणि मग अनेक म्युटेशननंतर माणसांमध्ये परत आला, याबद्दलचे पुरावे चिनी शास्त्रज्ञांना मिळाले आहेत. माणसांमध्ये सापडलेले ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पाच व्हेरिएंट उंदरांच्या फुफ्फुसांमध्ये सापडलेल्या म्युटेशनसारखेच असल्याचं शास्त्रज्ञांना आढळून आलं आहे.
तिआंजिनमधल्या नानकाई विद्यापीठ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीज कंट्रोल एँड प्रिव्हेंशनच्या संशोधकांनी याबद्दल संशोधन केलं. बायोसेफ्टी अँड बायोसिक्युरिटी जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. ओमायक्रॉनचं मूळ शोधण्याचा प्रयत्न संशोधकांकडून सुरू आहे. यात ५० हून अधिक म्युटेशन होतात. आधीच्या कोणत्याच व्हेरिएंटमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात म्युटेशन झालेली नाहीत.