लंडन – दक्षिण आफ्रिकेतून जगभरात ओमायक्रॉन व्हेरिएंटचं भयानक चित्र आता समोर येत आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने संक्रमित करत असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. ब्रिटनला याची प्रचिती दिसून आली आहे. मागील २४ तासांत ब्रिटनमध्ये सर्वाधिक रुग्णाचा रेकॉर्ड मोडला आहे. याठिकाणी तब्बल ७८ हजार ६१० कोरोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आकडा आहे.
ब्रिटनच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्या ६.७ कोटी इतकी आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं संक्रमण वाढलं आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा कोरोनाची लाट पसरण्याची शक्यता असल्याचा इशारा पंतप्रधान बॉरिस जॉनसन यांनी दिला आहे. मंगळवारी ब्रिटनच्या १०० पेक्षा अधिक खासदारांनी महामारीचा वाढता प्रभाव रोखण्याच्या उपायाविरोधात मतदान केले. त्यामुळे ब्रिटन प्रशासनाला धक्का बसला आहे.
क्रिसमस आणि न्यू ईयरवर कोरोनाचं सावट
आरोग्य अधिकारी म्हणाले की, यूरोपात क्रिसमस आणि न्यू ईयर तयारी जोरात सुरु आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे या सणांवर दहशतीचं सावट आहे. यूरोपीय संघ ओमायक्रॉन व्हेरिएंटशी लढण्यास तयार आहे असं यूरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी सांगितले. याठिकाणी जवळपास ६६ टक्के लोकसंख्येचं संपूर्ण लसीकरण झालं आहे. परंतु वेगाने वाढणाऱ्या कोरोनानं ब्रिटनच्या चिंतेत भर टाकली आहे.
भारतातही ओमायक्रॉनच्या रुग्णांत वाढ
देशातील ओमायक्रॉनच्या केसेस सातत्याने वाढत आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांची एकूण संख्या आता ५८ झाली आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि दिल्लीत ओमायक्रॉन झपाट्याने पसरतो आहे. भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ झाली आहे. महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे आणि आतापर्यंत एकूण २८ प्रकरणे नोंदविली गेली आहेत. राजस्थान १३ प्रकरणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय गुजरात (४), कर्नाटक (३), केरळ (१), आंध्र प्रदेश (३) आणि दिल्ली (६) येथे रुग्ण आहेत.
देशात बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ६,९८४ रुग्ण आढळले, तर २४७ जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना विषाणूमुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ४,७६,१३५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या ८७,५६२ आहे. सलग ४८ दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या ही १५ हजारांच्या आत राहिली आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत १,४३१ ची घट झाली, असेही निवेदनात म्हटले आहे.