बागलादेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना पदाचा राजीनामा देऊन भारतात आल्यानंतर, तेथे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. मात्र, हे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच अंतर्गत मतभेत चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. हे अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर केवळ आठ दिवसांतच एक मोठा फेरबदल करण्यात आआला आहे.
गृह मंत्रालयाच्या सल्लागाराला रातोरात हटवलं -बांगलादेशातील डेली स्टार वत्त पत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ब्रिगेडियर जनरल (सेवानिवृत्त) एम सखावत हुसैन यांना देशातील अंतरिम सरकारमधील गृह मंत्रालयाच्या सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल जहांगीर आलम चौधरी यांना शुक्रवारी रात्रीच नियुक्त करण्यात आले आहे. जहांगीर यांच्यासह चार नवीन सल्लागारांनी पदाची शपथ घेतली. सरकारी वृत्तसंस्था 'बांग्लादेश संगाबाद संस्थे'ने (BSS) दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने चार मंत्रालये आणि राष्ट्रपती कार्यालयात करारावर पाच सचिवांची नियुक्ती केली आहे.
...या कारणामुळं गेली खुर्ची -ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत यांना, त्यांच्याच वक्तव्यावर बोट ठेवत गृह सल्लागार पदावरून हटवण्यात आले आहे. विद्यार्थी नेत्यांनी त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. यानंतर, बीएनपी आणि त्यांच्या तीन सहकारी संघटनांनी त्यांचा राजीनामा मागितला होता.
'...मला काही फरक पडत नाही' - सखावत यांनी 11 ऑगस्टला सर्व राजकीय पक्षांना इशारा देत म्हटले होते, जर आता आपल्याला वाटत असेल की, आपण बाजारांवर नियंत्रण मिळवू शकाल आणि जबरदस्तीने वसुली करू शकाल, तर आपण पुढे येऊ शकता आणि काही काळापर्यंत असे करू शकता. मात्र, मी सैन्याच्या प्रमुखांना आपल्या तंगडी तोडण्याची विनंती केली आहे. मला काही फरक पडत नाही. तुम्ही 'भाड'मध्ये जा. त्यांच्या या वक्तव्यावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
मुख्य सल्लागार युनुस यांच्या प्रेस विंगनुसार, अंतरिम सरकारने आठ सल्लागारांच्या विभागाचे पुन्हा नव्याने वाटप केले आहे. यात, सखावत यांना कपडे आणि जूट मंत्रालय, तर जहांगीर आलम यांना कृषी मंत्रालय देण्यात आले आहे.
15 ऑगस्टला काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी? -78व्या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशात राहत असलेल्या हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. "बांगलादेशात जे काही घडले, त्यासंदर्भात एक शेजारील देश म्हणून चिंता वाटते. तेथील परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होईल अशी आशा करतो. विशेषतः तेथील अल्पसंख्याकांची सुरक्षितता सुनिश्चित व्हावी, अशी 140 कोटी देशवासियांची इच्छा आहे.
17 ऑगस्टला बांगलादेशच्या पंतप्रधानांचा पीएम मोदींना फोन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यात शुक्रवारी फोनवरून चर्चा झाली. या संभाषणानंतर पंतप्रधान मोदी यांनी X वर लिहिले, "मला मोहम्मद युनूस यांचा फोन आला होता. आम्ही बांगलादेशच्या सद्यस्थितीसंदर्भात चर्चा केली. मी लोकशाही, स्थैर्य, शांततापूर्ण आणि प्रगतीशील बांगलादेशसाठी भारताचा पाठिंबा व्यक्त केला. त्यांनीही (मोहम्मद युनूस) बांगलादेशातील हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचे आश्वासन दिले आहे."