तिबेटमध्ये मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ६.८ इतकी मोजली आहे. चीनच्या सरकारी मीडियानुसार, आतापर्यंत ९५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर सुमारे १३० लोक जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता तिबेटमधील डिंगरी काउंटी भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू 28.5 अंश उत्तर अक्षांश आणि ८७.४५ अंश पूर्व रेखांशावर आढळून आला. ते जमिनीपासून १० किलोमीटर खोलीवर होते.
नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. लोक घरे सोडून बाहेर पळत सुटले होते, पाळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. काठमांडूचे लोक प्रचंड घाबरले होते. रस्त्यावरील विजेचे खांब आणि झाडे हादरताना दिसली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, सकाळी ७ च्या सुमारास ४ ते ५ तीव्रतेचे ६ हून अधिक आफ्टरशॉक आले. या भूकंपाच्या धक्क्यांनी २०१५ च्या नेपाळ भूकंपाची आठवण करून दिली, यामध्ये सुमारे ९००० जणांचा मृत्यू झाला होता.
भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. बिहार, आसाम, बंगाल आणि सिक्कीममध्येही पृथ्वी हादरली. बिहारमधील पाटणा, मुझफ्फरपूर, समस्तीपूर, मोतिहारी, बेगुसराय, मुंगेर, शिवहर आणि सारण येथे भूकंपाचे धक्के जाणवले.