वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसचा उपद्रव रोखण्यासाठी तातडीचे साहाय्य म्हणून जागतिक बॅँकेने भारताला १ अब्ज अमेरिकन डॉलरची (सुमारे ७६ हजार कोटी रूपये) मदत जाहीर केली आहे. जगामध्ये होत असलेला या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक बॅँकेने १.९ अब्ज डॉलरच्या साहाय्याची घोषणा केली, त्यातील सर्वात मोठा वाटा भारताला मिळाला आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी जगातील देशांना मदत व्हावी या हेतूने जागतिक बॅँकेने तातडीची मदत देण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात २५ देशांना १.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत देण्यात येणार आहे. त्यामध्ये भारताचा समावेश असून, यापैकी सर्वाधिक मदत (१ अब्ज डॉलर्स) भारताला मिळाली आहे. जगभरातील ४० देशांना कोरोनाविरूद्धची लढाई वेगाने लढण्यासाठी जागतिक बॅँक मदत देणार आहे.
भारताला मिळणाऱ्या १ अब्ज डॉलरच्या मदतीतून विविध सोयी व सुविधा कोरोनाच्या रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. या मदतीमधून रुग्णांचे स्क्रीनिंग, ट्रेसिंग, प्रयोगशाळांमधील तपासणी याशिवाय वैयक्तिक सुरक्षिततेची उपकरणे पुरविणे आणि विशेष विलगीकरण कक्षांची निर्मिती करण्यात येणार आहे.
येत्या १५ महिन्यात जागतिक बॅँक कोरोनाविरूद्धच्या लढाईसाठी १६० अब्ज डॉलर्सची मदत विविध देशांना देणार आहे. यामधून आरोग्यविषयक सुविधांचे आधुनिकीकरण आणि अर्थव्यवस्था पूर्ववत करण्याला साहाय्य करता येणार आहे. कोरोनामुळे गरीब नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे तो कमी व्हावा यासाठी जागतिक बॅँक ही मदत देत असल्याचे जागतिक बॅँकेचे ग्रुप प्रेसिडेंट डेव्हिड मालपास यांनी सांगितले. ६५ देशांमध्ये आम्ही आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या असून, या विषाणूचा प्रसार लवकरात लवकर रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकसनशील देशांना कोरोना व्हायरसच्या विरोधात लढता यावे यासाठी आम्ही मदत देत आहोत. या मदतीतून या देशांमधील गरिबांना आर्थिक व सामाजिक परिणामांचा मुकाबला चांगल्या पद्धतीने करता येईल अशी आम्हाला आशा आहे. जगभरातील गरीब देशांना अधिकाधिक मदत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मालपास यांनी स्पष्ट केले.
पुरवठा साखळी सुरळीत करणार
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर झाले आहे. यामुळे वस्तू आणि सेवांची पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, अर्थव्यवस्थांवर याचा विपरीत परिणाम होत आहे. विविध देशांच्या सरकारांच्या वतीने जागतिक बॅँक या पुरवठादारांशी संपर्क साधून पुरवठा साखळी सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती जागतिक बॅँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाचा मुकाबला : सर्वात मोठा वाटा भारताला मिळाल्याने समाधान