Trending News: अनेकदा एखाद्या व्यक्तीची चूक नसताना, तो चुकीच्या प्रकरणात अडकतो आणि मग त्यातून बाहेर पडताना वर्षानुवर्षांचा कालावधी जावा लागतो. चुकीच्या प्रकरणात गंभीर आरोपांखाली अटक झाली असल्यास कौटुंबिक, सामाजिक अनेक संघर्षातून जावे लागते. केवळ भारतात नाही, तर जगभरात थकीत न्यायालयीन प्रकरणांची संख्या मोठी आहे. एका व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी तब्बल ४७ वर्षांचा कालावधी जावा लागला. दीर्घ काळानंतर या व्यक्तीला न्यायालयाने निर्दोष मानले. एका डीएनए चाचणीमुळे सदर व्यक्ती निर्दोष ठरली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. ही घटना १९७५ साली अमेरिकेत घडली होती. एक अल्पवयीन मुलगी शाळेतून घरी जाताना तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी परिसरात संशयित माणसाचा शोध सुरू केला. या शोधकार्यात पोलिसांनी आफ्रिकन अमेरिकन लियोनार्ड मॅक नावाच्या व्यक्तीला अटक केली. ही घटना घडली, तेव्हा डीएनए चाचणी विकसित झाली नव्हती. या कारणास्तव मॅककडे स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नव्हते. बलात्काराच्या या प्रकरणात तो दोषी सिद्ध झाला होता.
डीएनए चाचणीचा रिपोर्ट आला अन् निकाल बाजूने लागला
या आरोपांखाली अटक झाल्यानंतर मॅक यांनी तब्बल ७.५ वर्षे तुरुंगात काढली. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, असे मॅक यांचे म्हणणे होते. मात्र, ते सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कोणताच पुरावा नव्हता. मात्र, मॅक यांनी जिद्द सोडली नाही. न्याय मिळवून देण्यात डीएनए चाचणीने महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात, अनेक दशकांनंतर, डीएनए चाचणीने न्यायालयाचा निर्णय पूर्णपणे खोडून काढला. आपल्यावरील हा डाग पुसण्यासाठी मॅक यांनी दीर्घ लढा दिला आणि ४७ वर्षांनंतर त्यांना न्याय मिळाला. अमेरिकेच्या इतिहासातील हा सर्वात वाईट निर्णय असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान, एका अहवालानुसार १९८९ पासून आतापर्यंत ५७५ निरपराधांना केवळ डीएनए चाचणीमुळे न्याय मिळाला आहे. यापैकी अनेकजण अजूनही प्रतीक्षेत आहेत. अखेर मी निर्दोष ठरलो, अशी प्रतिक्रिया मॅक यांनी दिली.