वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी काही वेळासाठी डिअॅक्टिव्हॅट करण्यात आले होते. दरम्यान, काही वेळानंतर समस्या दूर करण्यात आल्या आणि आता त्यांचे ट्विटर अकाऊंट व्यवस्थित काम करत आहे. तेथील स्थानिक वेळानुसार, गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट उपलब्ध नाही, असे सांगितले जात होते. मात्र यानंतर 10 मिनिटांनी अकाऊंट सुरू झाले.
ट्विटर कर्मचाऱ्यांच्या मानवी चुकांमुळे ट्रम्पचे यांचे अकाऊंट डिअॅक्टिव्हॅट झाले होते, असा संदेश काही वेळानंतर ट्विटरकडून मिळाला. यामुळे जवळपास 11 मिनिटांपर्यंत ट्रम्प यांचे अकाऊंट बंद होते, मात्र पुन्हा त्यांचे अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. ही चूक कशी झाली, याची आम्ही चौकशी करत आहोत, असे ट्विटरकडून सांगण्यात आले. यानंतर असे समजले की, ट्विटर कस्टमर सपोर्टमध्ये काम करणा-या कर्मचा-याकडून ही चूक झाली होती. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ट्विटरवर फॉलो केल्या जाणा-या जगभरातील नेत्यांपैकी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटरवर 4 कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ट्रम्प सोशल मीडियावर सक्रीय आहेत. दरम्यान, ज्या कर्मचा-यानं हे कृत्य केले त्याचा कंपनीमध्ये शेवटचा दिवस होता, अशी माहिती समोर आली आहे.