बीजिंग, दि. 4 - 'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केलं आहे. ब्रिक्स शिखर परिषदेत संबोधित करत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
'जगभरात अनेक बदल होत असून, यामध्ये ब्रिक्स महत्वाची भूमिका बजावत आहे. ग्लोबल गव्हर्नन्समध्ये आपण अॅक्टिव्ह सहभाग घेणं गरजेचं आहे. आपण सहभाग घेतल्याशिवाय जगासमोर असणा-या अनेक समस्या सुटणार नाहीत', असं शी जिनपिंग बोलले आहेत. 'आम्हा पाच देशांमध्ये मतभेद असले तरी आमचा विकास त्याच गतीने आणि त्याच कारणांमुळे होत आहे', असं शी जिनपिंग यांनी सांगितलं. तसंच 'आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकासाच्या दृष्टीने आपण सर्वांनी एकजुटीने आवाज उठवत, समस्यांवरही एकत्रितपणे मार्ग काढला पाहिजे', असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा शांतता आणि विकासासाठी सहकार्याचं आवाहन केलं आहे. 'शांती आणि विकासासाठी ब्रिक्स देशांनी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी बोलताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि चीनकडून त्यांना मिळणारा आश्रय यासंबंधी थेट उल्लेख केला नसला, तरी त्यांच्या या वक्तव्याने अप्रत्यक्ष इशारा दिला असल्याचं तज्ञ सांगत आहेत.
चीनमधील शियामेन शहरात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत, एकत्रितपणे शांती आणि विकासाचं ध्येय साध्य केलं जाऊ शकतं असं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील अशी अपेक्षा आहे. सोमवारी संध्याकाळी होणा-या संयुक्त निवेदनात मोदी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करतील असं बोललं जात आहे. चीनने मात्र याआधीच मोदींनी असं करु नये असा इशारा दिला आहे.
मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे - - विकासासाठी ब्रिक्स देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि इनोव्हेशनची आवश्यकता आहे. शांती आणि विकासासाठी एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं.- आम्ही गरिबी हटवण्यासाठी मिशन मोडवर काम करत आहोत. ज्यामुळे आरोग्य, स्वच्छता, तांत्रिक कौशल्य, अन्न सुरक्षा, लैंगिक समानता आणि शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकेल.- ब्रिक्सच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या एनडीबीने देशांच्या दिर्घकालीन विकासासाठी कर्ज देण्यास सुरुवात केली पाहिजे.- आम्ही काळ्या पैशाविरोधात लढा पुकारला आहे. स्वच्छता अभियानाला सुरुवात केली आहे. भारत गरिबीशी लढा देत आहे. पुढील दशक अत्यंत महत्वाचं असणार आहे. ब्रिक्स देशांवर बदलाची जबाबदारी आहे. - भारत एक तरुण देश आहे, आणि हीच आमची ताकद आहे. भारतातील 80 कोटी तरुण आमची ताकद आहेत. स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीने पुढील दशक अत्यंत महत्वाचं आहे.