पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीत हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा सर्वात वाईट परिणाम हा लहान मुलांवर झाला आहे. जवळपास महिनाभरापासून सुरू असलेल्या या युद्धाचा मुलांवर किती परिणाम झाला आहे, याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दर दहा मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होत आहे. तसेच दर दहा मिनिटाला दोन मुलं जखमी होत आहेत, म्हणजेच दर दहा मिनिटाला तीन मुलांवर हल्ल्याचा परिणाम होणार आहे.
पॅलेस्टाईनच्या आरोग्य मंत्रालयाने 7 ऑक्टोबरपासून युद्ध सुरू झाल्यापासून 5 नोव्हेंबरपर्यंत मृतांची संख्या दिली आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 9,770 पॅलेस्टिनी मारले गेल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. यापैकी 4,100 म्हणजे जवळपास निम्मी मुलं आहेत. गाझामध्ये 8,067 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी अनेक गंभीर आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की 1,250 मुलं बेपत्ता आहेत. इस्त्रायली हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 70 टक्के मुलं, महिला आणि वृद्ध असल्याचही म्हटलं आहे.
गाझामधील एक महिन्याच्या युद्धाची आकडेवारी सांगते की, येथे दररोज सरासरी 100 हून अधिक मुलं मारली जात आहेत. अलिकडच्या वर्षांत, अनेक देशांमध्ये युद्ध झाली आहेत परंतु मुलं अशा प्रकारे बळी ठरलेली नाहीत. गाझामध्ये दररोज सरासरी 136 मृत्यू होतात. अलिकडच्या वर्षांत युद्धाचा सामना करणार्या सीरियामध्ये दररोज सरासरी बालमृत्यूची संख्या 3, अफगाणिस्तान 2, येमेन 1.5, युक्रेन 0.7 आणि इराक 0.6 आहे.
सीरियामध्ये 2011 ते 2022 या 11 वर्षात 12 हजार मुलांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानमध्ये 2009 ते 2020 या 12 वर्षांत 8 हजार मुलांचा मृत्यू झाला. येमेनमध्ये 2015 ते 2022 या 8 वर्षांत 3700, इराकमध्ये 2008 ते 2022 या 14 वर्षांत 3100 आणि युक्रेनमध्ये गेल्या दोन वर्षांत 510 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गाझामध्ये अवघ्या एका महिन्यात 4100 मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. जो अत्यंत चिंताजनक आकडा आहे.
7 ऑक्टोबर रोजी दहशतवादी संघटना हमासने दक्षिण इस्रायलवर हल्ला केला आणि सुमारे 1400 लोक मारले. तसेच 200 हून अधिक लोकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवले होते. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये सातत्याने हल्ले केले आहेत. इस्रायलने हमासला लक्ष्य करून हल्ले केल्याची चर्चा आहे.