टोकियो - जपानला 'हगीबिस' चक्रीवादळाचा तडाखा बसल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 60 वर्षातील जपानमधील हे सर्वांत शक्तिशाली वादळ असल्याची माहिती मिळत आहे. या वादळामुळे आतापर्यंत एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तुफान पाऊस आणि जोरदार वाऱ्यांचा तडाखा जपानच्या अनेक भागांना बसला आहे. वादळादरम्यान झालेल्या वेगवान वाऱ्याने टोकियोला अक्षरश: झोडपून काढले.
'हगीबिस' चक्रीवादळामुळे जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत 73 लाख नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. सार्वजनिक ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना समोर येत आहेत. जपानमधील रेल्वेसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. वारा आणि पाऊस यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. जवळपास 30,000 घरांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोकियोतील सर्व चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल आणि इतर ठिकाणं बंद ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन सेवांना दक्ष राहण्यास सांगण्यात आले आहे. चक्रीवादळामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. 144 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने वारे वाहत असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सुमारे 73 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. वादळाला ‘हगिबीस’ हे नाव फिलीपाईन्सने दिले असून याचा अर्थ 'वेगवान' असा होतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
नदीजवळ राहणाऱ्या लोकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन आश्रय घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. वाऱ्याचा तासाला 144 किलोमीटर वेग आहे. टोकियो आणि उत्तर जपानकडे वारे वाहत असून, अनेक भागांना मोठा तडाखा बसला आहे. जपानच्या हवामान विभागाने टोकियो आणि परिसराला वादळाचा जोरदार तडाखा बसेल असा इशारा दिला होता. शिझुका भागाला 5.3 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. 1958 मध्ये आलेल्या चक्रीवादळानंतरचं हे सर्वांत शक्तिशाली वादळ ठरू शकतं. चक्रीवादळानंतर 1,200 लोकांचा मृत्यू झाला होता.