प्रश्न: अमेरिकेच्या नॉन इमिग्रंट व्हिसासाठी मला ट्रॅव्हल एजंटची गरज लागेल का? व्हिसा अर्जाच्या प्रक्रियेबद्दलची खात्रीलायक माहिती कुठे मिळू शकेल? त्या प्रक्रियेदरम्यान मला शंका असल्यास मी काय करावं? उत्तर: अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करताना तुम्हाला ट्रॅव्हल एजंटची गरज लागत नाही. कोणाचीही मदत न घेता, त्यासाठी कोणतंही शुल्क न मोजता तुम्ही व्हिसासाठी अर्ज करू शकता. व्हिसासाठी अर्ज करताना आवश्यक असणारी योग्य आणि अचूक माहिती तुम्हाला www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर मिळेल. या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत सविस्तर माहिती उपलब्ध आहे. विविध प्रकारचे व्हिसा, त्यासाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याचा तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न (frequently asked questions) हा विभाग अर्जदारांसाठी उपयुक्त ठरतो. www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर उत्तर न सापडल्यास किंवा तुम्हाला एखादा विशिष्ट प्रश्न असल्यास तुम्ही तो india@ustraveldocs.com या मेलवर विचारू शकता. ट्रॅव्हल एजंटची मदत घेत असताना काही गोष्टींची काळजी घ्या. तुम्ही दोन्ही ठिकाणी, अर्जात आणि मुलाखतीवेळी दिलेली माहिती पूर्ण आणि अचूक असावी. तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाइन जमा करताना इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी करता. याचा अर्थ तुम्हाला अर्जातील प्रश्न समजले असून तुम्ही त्याची योग्य उत्तरं दिली आहेत असा होतो. त्यानंतर तुमच्या मुलाखतीआधी तुमच्या हातांच्या ठशांचं इलेक्ट्रॉनिक स्कॅनिंग केलं जातं. याचा अर्थ तुम्ही दिलेली उत्तरं पूर्णपणे खरी आहेत असा होतो. अशा वेळी तुम्हाला माहिती लपवण्यास किंवा चुकीची माहिती देण्यास सांगणारा ट्रॅव्हल एजंट योग्य नसल्याचं समजावं. व्हिसा मिळेलच याची खात्री कोणताही ट्रॅव्हल एजंट देऊ शकत नाही. तुम्हाला व्हिसा द्यायचा की नाही, याचा निर्णय दुतावासातील अधिकारी घेतो. तुमची मुलाखत पूर्ण झाल्यानंतर अधिकारी हा निर्णय घेतो. हा निर्णय इतर कोणतीही व्यक्ती घेत नाही. त्यामुळे कोणीही व्हिसा मिळवून देण्याची खात्री देत असल्यास सावध व्हा. खोटी कागदपत्रं पुरवून किंवा उत्तरं सुचवून एखादी व्यक्ती व्हिसाची हमी देत असल्यास काळजी घ्या. खोटी उत्तरं किंवा कागदपत्रं देताना पकडले गेल्यास तुम्हाला कधीही अमेरिकेचा व्हिसा मिळणार नाही.
अमेरिकेचा नॉन इमिग्रंट व्हिसा मिळवण्यासाठी ट्रॅव्हल एजंटची गरज लागते का?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2019 10:00 AM