अमेरिकेत गोळीबाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील आयोवा येथील हायस्कूलमध्ये हँडगन आणि शॉटगनसह एका मुलाने एका विद्यार्थ्याची हत्या केली आणि पाच जणांना जखमी केलं आहे. गोळीबारानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली, रुग्णवाहिका आणि पोलिसांच्या टीम पेरी हायस्कूलमध्ये पोहोचल्या आहेत.
एएफपीच्या रिपोर्टनुसार, योवा डिव्हिजन ऑफ क्रिमिनल इन्वेस्टिगेशनचे सहाय्यक निर्देशक मिच मोर्टवेट यांनी सांगितलं की, मृत्यू झालेला विद्यार्थी ही सहावीत शिकत होता, म्हणजेच 11 किंवा 12 वर्षांचा होता. नाश्त्यासाठी तो हायस्कूलमध्ये होता असं म्हटलं जात आहे.
मिच मोर्टवेट म्हणाले की, जखमी झालेल्यांमध्ये इतर चार विद्यार्थी आणि एका शाळा प्रशासकाचा समावेश आहे. पोलिसांच्या पथकाला शाळेत एक स्फोटक यंत्रही सापडले, ते त्यांनी निकामी केलं. आमच्या टीमला हल्लेखोर मृतावस्थेत आढळला. त्याने स्वतःवरच गोळी झाडली होती."
हायस्कूलची विद्यार्थिनी एवा ऑगस्टसने स्थानिक टीव्ही स्टेशनला सांगितलं की गोळीबार झाला तेव्हा ती तिच्या वर्गात लपली होती. अधिकार्यांनी तिला धोका टळल्याचे सांगताच ती बाहेर पळाली. ती बाहेर आली तेव्हा जमिनीवर सगळीकडे काचा आणि रक्त होते. गोळीबारात जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे मोर्टवेट यांनी सांगितलं.