जगभरात महागाईमुळे जनता त्रस्त असून सर्वाधिक महागाई खाद्यपदार्थांवर होत आहे. या यादीत फिलिपीन्सचाही समावेश असून येथे कांदा आता लोकांना रडवत आहे. एप्रिल 2022 च्या तुलनेत आता कांद्याच्या भावात 1000 रुपयांनी वाढ झाली आहे यावरून याचा अंदाज लावता येतो. देशातील महागाईचा दर सुमारे 14 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. फिलिपीन्समध्ये महागाईचा दर 8.7 टक्के झाला आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका खाद्यपदार्थांना बसला आहे.
एक किलो कांद्याचा भाव आता 800 पेसोपर्यंत पोहोचला आहे. भारतीय रुपयात बघितले तर ते 1200 रुपयांच्या आसपास होते. फिलिपीन्समध्ये कांद्याच्या किमतीत ही वाढ 10 महिन्यांत दिसून आली आहे. एप्रिल 2022 मध्ये, एक किलो कांदा 70 पेसोस (105 रुपये) उपलब्ध होता. देशात चिकन आणि मटणापेक्षा कांद्याचे भाव जास्त असल्याने लोकांची चवच बिघडली आहे. महागाईने होरपळणाऱ्या नागरिकांच्या स्वयंपाकघरातून कांदा जवळपास गायब झाला आहे.
कांद्याचे भाव आटोक्यात आणण्यासाठी सरकारने पावले उचलली असली तरी त्यावर तात्काळ उपाय दिसत नाही. अहवालानुसार, फिलिपीन्स सरकारने 21,000 टन कांदा आयात करण्यास मान्यता दिली आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या देशांमध्येही कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. डाउनच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये कांदा 250 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे, तर श्रीलंकेत डिसेंबर 2022 मध्ये तो 320 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
फिलिपीन्समध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना भारतात मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडी मोलाची किंमत मिळत आहे. महाराष्ट्रातील अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने सोलापुरातील बाजार समितीत 10 पोते कांदे विकण्यास आणले होते. लिलाव झाला अन् भाव मिळाला. पट्टी तयार करण्यासाठी अडत व्यापाऱ्याने पावती पुस्तक काढले तेव्हा शेतकऱ्याला केवळ दोन रुपये 49 पैसे देणे निघाले. 10 पिशव्या कांद्याचे वजन 512 किलो झाले. त्याला भावही एक रुपया किलो मिळाला. विकलेला कांदा, त्याचे वजन आणि भाव पाहता कांद्याचे एकूण 512 रुपये झाले. त्यामधून हमाली 40.45 रुपये, तोलाई 24.06 रुपये, मोटारभाडे 15, रोख उचल 430 असा खर्च वजा जाता 10 पोते कांदे विकल्यावर फक्त 2 रुपये 49 पैसे पट्टी मिळाली. या पट्टीची चिठ्ठी अन् अडत्याने शेतकऱ्याला दिलेला चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"