भुवनेश्वर : कोरोनाची साथ व त्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ओडिशातील सरकारी शाळांतल्या १० वीच्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद असल्याने खासगी शिक्षणसंस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी याआधीच आॅनलाइन वर्ग सुरू केले आहेत. मात्र, संसाधनांची कमतरता असल्यामुळे सरकारी शाळांना असे वर्ग सुरू करणे शक्य होत नव्हते. पण, आता ती त्रुटी दूर झाली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री समीर रंजन दास यांनी सांगितले की, यंदाच्या शैक्षणिक वर्षात सरकारी शाळांतील दहावीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षणासाठी सज्ज राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी अध्यापनाच्या नवनव्या पद्धती वापरण्यावर राज्य सरकारने भर दिला आहे. ओडिशातील लॉकडाउनची मुदत राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत वाढविली आहे. तसेच, शिक्षणसंस्था १७ जूनपर्यंत बंद राहाणार आहेत. लॉकडाऊनमुळे नवी पाठ्यपुस्तके मिळण्यास विलंब लागणार असल्याचे ओडिशा सरकारने म्हटले आहे.‘दिशा अॅप’चा वापरओडिशातील सरकारी शाळांतल्या १० वीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकविण्यासाठी शिक्षक दिशा अॅपचा वापर करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या आॅनलाइन शिक्षणासाठी हे अॅप केंद्र सरकारने तयार केले आहे.
‘यूएई’मध्ये होणार आॅनलाइन विवाहदुबई : कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी लोकांच्या सार्वजनिक वावरावर संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या कालावधीत जोडप्यांना आॅनलाइन विवाह करण्यास संयुक्त अरब अमिरातीने परवानगी दिली आहे. यासंदर्भात, न्याय खात्याने सांगितले की, कागदपत्रे सादर केल्यानंतर विवाहासाठी एक विशिष्ट तारीख ठरवून धर्मगुरूंच्या साक्षीने आॅनलाइन पद्धतीने विवाह पार पाडण्याची मुभा देण्यात आली आहे. जोडप्याने कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रियाही आॅनलाइनच करावयाची आहे. या आॅनलाइन विवाहप्रसंगी धर्मगुरूवधू व वराची; तसेच साक्षीदारांची ओळख पटवेल.