ऑनलाइन लोकमत
जाकार्ता, दि. 1 - सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअजिज सौद बाली बेटावरील सुट्टीसाठी ४६० टन वजनाच्या सामानासह इंडोनेशियामध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या या सामानासह १००० लोकांचा मोठा लवाजमाही त्यांच्याबरोबर आहे. गेल्या ५० वर्षात सौदीच्या राजांनी इंडोनेशियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या १००० लोकांमध्ये मंत्री आणि सौदी घराण्याच्या राजकुमारांचा समावेश आहे. जाकार्ता येथील विमानतळावर पोहोचल्यावर राजे सलमान यांचे स्वागत इंडोनेशियाचे पंतप्रधान जोको विडोडो यांनी केले तसेच राजांना मानवंदनाही देण्यात आली. विमानतळावरुन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्था़नापर्यंत राजे सलमान यांच्या मोटारीच्या ताफ्याच्या दुतर्फा उभे राहून इंडोनेशियन नागरीकांनी त्यांचे स्वागत केले.
४६० टन वजनाच्या सामानामध्ये मर्सिडीज लिमोझिन तसेच विमानातून उतरण्यासाठी एस्कलेटरचाही समावेश आहे. हे सगळे साहित्य बाली बेटावरच्या रिसॉर्टवर पाठवून देण्यात आले आहे. बाली बेटावर राजांच्या सुरक्षेसाठी १ हजार सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली असून या सुरक्षाव्यवस्थेमध्ये ७८ कार आणि ३८ मोटरसायकल्सचा समावेश आहे.
हिंदुबहुल बाली बेटावर राजे सलमान काही दिवस मुक्काम करणार आहेत त्यानंतर ते ब्रुनेईजपान, चीन आणि मालदीवच्या भेटीवर जातील. हा सगळा दौरा तीन आठवड्यांचा असेल. या भेटीमध्ये इंडोनेशियामध्ये राजे सलमान अरबी भाषा शिकवणा-या तीन संस्थांचे उद्घाटनही करणार आहेत.
सलमान यांच्या या दौ-याकडे मध्यपुर्वेसह जगातील इतर देशांचेही लक्ष आहे. आग्नेय आशिया तसेच आशियातील देशांमध्ये सलमान विविध विषयांशी संबंधित करार करुन सौदीचे संबंध वाढवणार आहेत.
१५० शेफसची फौज
राजे सलमान यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेण्यासाठी १५० हून अधिक शेफ तयार ठेवण्यात आले आहेत. हे सगळे शेफ आठ दिवस तीन पाळ्यांमध्ये काम करून २४ तास राजांना सेवा पुरवतील. त्यांच्या खाण्याचं कंत्राट एरोफुड केटरिंग सर्विसेस (एसीएस) ला देण्यात आले आहे. एसीएस ही इंडोनेशियाच्या गरुडा एअरलाइन्सची खाद्यसेवा असून राजे सलमान यांच्यासाठी त्याचे शेफ्स खास मध्य-पुर्वेमध्ये लोकप्रिय असणारे पदार्थ बनवतील