इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही अमेरिकेमध्ये पोहोचले आहेत. अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने त्यांच्याकडे स्वत:चे विमान नाही. यामुळे ते प्रवासी विमानाने निघणार होते. मात्र, सौदीच्या प्रिन्सने खान यांना विशेष अतिथी असल्याचे सांगत आपल्या विमानाने अमेरिकेला नेले. अमेरिकेत गेल्यावर वेगळ्याच मानापमान नाट्याला सुरूवात झाली आहे.
अमेरिकेला मोदी पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तर इम्रान खान यांचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे. यावरून पाकच्या मंत्र्यांचा तिळपापड झाला असून अमेरिकेवर विश्वास ठेवण्यासारखे नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. याला कारणही तसेच होते. इम्रान खान यांच्या स्वागताला कोणताही मोठा अधिकारी हजर नव्हता. तर मोदी यांना रेड कार्पेट आणि खान यांना एक फुटी मॅट घातल्याचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. यामुळे पाकिस्तान्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेला जाण्याआधी इम्रान खान काश्मीरमुद्द्यावर समर्थन मिळविण्यासाठी सौदी अरबच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सलमान बिन अब्दुलाजिज अल सौद यांच्याशी चर्चा केली. यावेळी काश्मीरसह व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक संबंधांवरही चर्चा झाली. यावेळी दोघेही अमेरिकेला निघणार होते. मात्र, अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर विशेष विमानाऐवजी प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली आहे. यामुळे इम्रान खान प्रवासी विमानाकडे जायला निघाले. यावेळी सौदीच्या प्रिन्सने खान यांना विशेष अतिथी असल्याचे सांगत आपल्या विमानाने अमेरिकेला नेले.