इंग्लडमध्ये शिक्षक असलेल्या भारतीय वंशाच्या रेखा पटेल (४३) यांनी त्यांचे बाजारभावानुसार अडीच लाख पौंडांत विकले जाऊ शकणारे घर अवघ्या दोन पौंडांत विकले. याचे कारण म्हणजे त्यांनी याच घरात भाडेकरू म्हणून राहण्याचा करार केला असून, त्यांना त्यांच्या या मालमत्तेतून कोणी बाहेर काढू शकणार नाही. रेखा पटेल यांचे सहा वर्षांपूर्वी त्यांच्या शेजाऱ्याशी या घरावरील काही बांधकामावरून भांडण सुरू झाले. ग्लोसोपमधील सिमोनडली खेड्यात २०१० मध्ये पटेल यांनी तेव्हा मोडकळीस आलेले दोन बेडरूमचे घर विकत घेऊन त्याला आपल्या स्वप्नातील घराचे स्वरूप देण्यासाठी दोन लाख पौंड खर्च केले. न्यायालयाने कोर्टाचे शुल्क व दाव्याचा खर्च ७६ हजार पौंड वसूल करण्यासाठी घर विकण्याचा आदेश दिला. घराची मालक असण्यापेक्षा मला भाडेकरू म्हणून जास्त हक्क असतील, हे मला लक्षात आले व त्यामुळे मी माझ्या स्वत:च्या घरात शांतपणे राहता यावे म्हणून सगळ््या कायदेशीर बंधनांना तोडून टाकण्याचा निर्णय घेतला, असे रेखा पटेल म्हणाल्या. १८ व्या शतकाच्या प्रारंभी बांधलेले हे घर रेखा पटेल यांनी दोन खासगी कंपन्यांना नुकतेच विकले व त्यांच्याशी याच घरात ५० पौंड महिन्याने राहण्याचा दहा वर्षांचा लेखी भाडेकरार केला. जे जे शक्य आहे ते ते मी करण्याचा प्रयत्न केला परंतु मला दुसरा पर्यायच नव्हता. दोन खासगी कंपन्यांशी मी योग्य ते करार केले असून या लोकांवर माझा विश्वास आहे. या खेड्यातील लोक अतिशय प्रेमळ आहेत. अनेक जणांनी माझ्या मदतीसाठी त्यांची कामेही बाजुला ठेवली होती, असे त्या म्हणाल्या. गुजरातमधील नवसारी येथील भारतीय दाम्पत्याची कन्या असलेल्या रेखा यांचा जन्म इंग्लडमधील. त्यांनी विकत घेतलेल्या या दोन बेडरूम घराची दुरुस्ती करताना त्यांच्या शेजाऱ्याच्या घराच्या छताची काहीशी हानी झाली आणि मग कायदेशीर खटलाच सुरू झाला. न्यायालयाने पटेल यांनी त्यांच्या शेजाऱ्याला घराची नुकसान भरपाई आणि दाव्याचा खर्च देण्याचा आदेश दिला. पटेल यांनी रक्कम भरलीही नंतर त्यांनी राहिलेल्या रक्कमेवर वाद निर्माण केला.
अडीच लाख पौंडांचे घर विकले केवळ दोन पौंडांत
By admin | Published: February 01, 2017 1:09 AM