युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियन सैन्याच्या कॅम्पवर मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला असून त्यात ११ रशियन सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. रशियाने याला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.
दोन जणांनी रशियन लष्कराच्या जवानांवर गोळीबार केल्याचे म्हटले जात आहे. हे दोघेही जण रशियन लष्करात वॉलेंटिअर म्हणून काम करत होते. दरम्यान, दोघांचाही खात्मा करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. रशियन लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनजवळील आर्मी फायरिंग रेंजमध्ये हा गोळीबार झाला. दोन्ही हल्लेखोर हे माजी सोव्हिएत युनियनचे नागरिक असल्याचं रशियानं म्हटलं आहे.
सुरू होती फायरिंग प्रॅक्टिसशनिवारी हे दोघे जण अन्य सैनिकांसोबत फायरिंगची प्रॅक्टिस करत होते. यादरम्यान अचानक त्या दोघांनी अन्य जवानांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. रशियन सैनिकांनी प्रत्युत्तरादाखल दोघांनाही ठार केले.
युक्रेनशी युद्ध करणाऱ्या रशियामध्ये नागरिकांची सैन्यात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अलीकडेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी ३ लाख राखीव सैनिक युद्धासाठी पाठवण्याची घोषणा केली. त्यानंतर युक्रेनच्या 4 भागांना रशियात विलीन करण्याची योजना होती. ती आता पूर्ण झाली आहे. लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या भागात शांतता राखण्यासाठी राखीव सैन्याची जमवाजमव आवश्यक असल्याचा युक्तीवाद पुतीन यांनी केला.
पुतीन यांच्या या निर्णयाचा मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता. अनेकांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. तर काही लोकांनी गुगलवर आपले हात तोडण्याच्या पद्धतीही सोधण्याचे प्रकार सुरू केल्याचे समोर आले होते.