वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पदावरून हटवावे की नाही, हे निश्चित करण्यासाठी त्यांच्याविरुद्धच्या महाभियोग चौकशीची खुली सुनावणी सुरू करण्यात आली असून, अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच ही सुनावणी बुधवारी दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे आपल्या तीन वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत सर्वात धोकादायक आव्हान उभे ठाकले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी पदाचा गैरवापर केला का? असा प्रश्न हाऊस आॅफ इंटिलेजेन्स कमिटीच्या अध्यक्ष अॅडम शिफ यांनी महाभियोग चौकशीसाठी अधोरेखित केला आहे. प्रकरण आधी साधे आणि तेवढेच भयानक आहे. या प्रश्नांवरील उत्तराने अध्यक्षांच्या भवितव्यावरच नव्हे तर अध्यक्षपदाच्या भवितव्यावर परिणाम होणार आहे. अमेरिकी जनतेला आपल्या राष्ट्रप्रमुखांकडून कसे वर्तन अपेक्षित आहे, हे कळणार आहे. हा क्षण व्हॉईट हाऊसच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे.ट्रम्प यांनी युक्रेनच्या दुबळेपणा फायदा घेऊन अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ढवळाढवळ करण्याचे आमंत्रण दिले का? हे अमेरिकी जनता आणि जगाला या खुल्या सुनावणीतून ऐकण्याची पहिली संधी असेल. युक्रेनवर दबाव टाकून २०२० मध्ये होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅटस्चे प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि त्यांच्या पुत्राविरुद्ध भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करण्याच्या मोबदल्यात ३९१ दशलक्ष डॉलरची लष्कर मदत देऊ केली, असा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे. तथापि, ट्रम्प यांनी या आरोपाचा इन्कार करीत मी काहीही गैर केलेले नसल्याचे स्पष्ट केले.तीन साक्षीदार महत्त्वाचेमहाभियोग प्रक्रियेत होणा-या खुल्या सुनावणीत विल्यम टेलर (युक्रेनधमील अमेरिकी राजनैतिक अधिकारी), जॉर्ज केंट (युरोप, युरेशियन व्यवहार विभागाचे उपसहायक विदेशमंत्री), तसेच युक्रेनमधील अमेरिकेच्या माजी राजदूत मेरी योव्हानोविच या तीन मुख्य साक्षीदारांची साक्ष ट्रम्प यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीची खुली सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 4:24 AM