इस्लामाबाद : निदर्शकांच्या सगळ््या घटनात्मक मागण्या मान्य केल्या असल्यामुळे आता आंदोलनाचे कोणतेच समर्थन होऊ शकत नाही, असे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी रविवारी म्हटले. विरोधी पक्ष नेते पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे (पीटीआय) प्रमुख इम्रान खान यांनी नवाज शरीफ यांनी निवडणुकीतील गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी ३० दिवस पद सोडावे, अशी मागणी केली आहे. सरकारने ही मागणी तात्काळ फेटाळून लावली आहे.विरोधकांनी आंदोलनात त्यांची शक्ती वाया घालविण्याऐवजी देशाचा विकास व प्रगतीत हातभार लावावा, अशी शरीफ यांनी खान यांच्या मागणीनंतर जाहीररीत्या प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.नवाज शरीफ यांचा राजीनामाच हवा अशी भूमिका इम्रान खान यांनी घेतली असल्यामुळे गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेली राजकीय कोंडी कायम आहे. मे २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार झाले का याची न्यायालयीन आयोगाच्या वतीने पारदर्शी पद्धतीने चौकशी होण्यासाठी शरीफ यांनी ३० दिवसांसाठी राजीनामा दिला पाहिजे, असे खान यांनी म्हटले. पीटीआयचे सदस्य गुलझार खान यांनी इस्लामाबादेतील धरणे आंदोलनादरम्यान राजीनाम्याच्या निर्णयावर नॅशनल असेम्ब्लीच्या सदस्यांशी पक्ष नेतृत्वाने विचारविनिमय केला नसल्याचा आरोप केला आहे. शनिवारी माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी लाहोरमध्ये शरीफ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राजकीय पेचप्रसंगावर चर्चा केली. (वृत्तसंस्था)
विरोधकांचे आंदोलन निरर्थक -शरीफ
By admin | Published: August 25, 2014 4:25 AM