वॉशिंग्टन : भारतात सध्या दोन भिन्न विचारसरणींमध्ये लढाई सुरू आहे. तथापि, भाजपच्या विचारसरणीला पर्याय देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील, असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे व्यक्त केला. त्यांनी येथील भारतीय समुदायाशी संवाद साधला.
राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आपण विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांना भेटतो तेव्हा आपण यावर भर देतो की, आम्ही एकत्र लढले पाहिजे. ते म्हणाले की, मीडियातील अनेक लोकांना भाजप आणि ‘आरएसएस’ यांना वास्तवापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण दाखविणे पसंत आहे. हिमाचल, कर्नाटक निवडणुकीचे उदाहरण यासाठी त्यांनी दिले. ते म्हणाले की, या निवडणुका पाहा. तुमच्या लक्षात येईल की, काँग्रेस पक्ष भाजपचा पराभव करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे.
ते म्हणाले, त्यांच्याकडे मीडिया आहे. त्यांनी संस्था ताब्यात घेतल्या आहेत. ते सर्व संस्थांवर दबाव आणतात. म्हणूनच, त्यांचा आवाज ऐकला जातो. पण, तर्काचा आवाज, आपुलकीचा आवाज कमी लेखू नका. आपल्या देशात प्रेमाची ताकद आहे. ती खूप शक्तिशाली आहे.
प्रेम आणि आपुलकी हा भारताचा स्वभाव
ही विचारसरणीची लढाई आहे. एक म्हणजे आपला देश शांतताप्रिय, अहिंसक, सत्यप्रिय आणि विनम्र प्रदेश असण्याचा महात्मा गांधींचा दृष्टिकोन. ही एक अशी दृष्टी आहे ज्यामध्ये आपले सर्व लोक, धर्म, जात आणि भाषा काहीही असोत, आपल्या राष्ट्राच्या प्रगतीत समान भागीदार आहेत. दुसरीकडे ‘आरएसएस’ची फुटीरतावादी अहंकार, अवैज्ञानिक आक्रमकतेची मानसिकता आहे. अनेक वर्षांपासून हा लढा सुरू आहे. प्रेम आणि आपुलकीने वागणे हा भारताचा स्वभाव आहे, यावर माझा ठाम विश्वास आहे.