पुतिनच्या धोरणांना विरोध, पाश्चात्य देशांशी संपर्क, बड्या नेत्याची हत्या, जंग जंग पछाडूनही कळेना मृत्यूचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 09:22 AM2022-11-30T09:22:44+5:302022-11-30T09:24:08+5:30
Russia: बेलारूसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेकी यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचं या आठवड्यात अचानक निधन झालं होतं. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई ही रशियाकडे वळली आहे.
मॉस्को - बेलारूसचे परराष्ट्रमंत्री व्लादिमीर मेकी यांची हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांचं या आठवड्यात अचानक निधन झालं होतं. त्यांच्या हत्येच्या संशयाची सुई ही रशियाकडे वळली आहे. बेलारूसचे राष्ट्रपती अलेक्झँडर लुकाशेंको यांनी त्यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहिली. तसेच तपासणीचे आदेश दिले आहेत. मंगळवारी बेलारुसची राजधानी मिंस्क येथे मेकी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
द डेली मेलच्या रिपोर्टनुसार ६४ वर्षीय माजी गुप्तहेर आणि राजकारणी व्लादिमीर मेकी यांची एका स्टिंग ऑपरेशनमध्ये हत्या करण्यात आली होती. ते युक्रेन युद्धाबाबत पाश्चात्य देशांच्या संपर्कात होते, तसेच बेलारुसला रशियामध्ये विलीन करून घेण्याच्या पुतीन यांच्या प्रयत्नांना त्यांचा विरोध होता, असा दावा करण्यात येत आहे. मीडियामधील वृत्तानुसार मेकी यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा स्टाफचीही लाय डिटेक्टर टेस्ट करण्यात येत आहे.
दरम्यान, मेकी यांच्या मृत्युमुळे राष्ट्रपती अलेक्झेंडर लुकाशेंको यंना धक्का बसला आहे. तसेच ते त्यांच्या सुरक्षेबाबत चिंतीत आहेत. रशिया आपली हत्या करू शकते, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे नोकर आणि भोजन करणारे स्वयंपाकी बदलले आहेत, असा दावा करण्यात येत आहे.
लुकाशेंको यांनी बेलारूसचं सैन्य तैनाक करून पुतिन यांच्या युद्धाला पाठिंबा देण्यास नकार आणि रशियामध्ये आपल्या देशाला सामील करून घेण्यास विरोध केल्यानंतर मेकीच्या मृत्यूच्या शक्यतांना बळ मिळालं आहे. पुतिन यांचे विरोधक आणि निर्वासित व्यावसायिक नियोनिद नेव्जलिन यांनी आरोप केला की मेकी यांचा मृत्यू एफएसबीच्या स्पेशल लॅबमध्ये तयार झालेल्या विषामुळे झाला आहे.