Narenda Modi in Bhutan: पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. पीएम मोदी सध्या दोन दिवसांच्या भूतान (Bhutan) दौऱ्यावर गेले असून, भूतानने मोदींना त्यांच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. अशाप्रकारे भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे मोदी पहिलेच नेते ठरले आहेत. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (Jigme Khesar Namgyel Wangchuck) यांनी पीएम मोदींना 'ऑर्डर ऑफ द ड्रक ग्याल्पो' (Order of The Druk Gyalpo) पुरस्काराने सन्मानित केले.
पुरस्कार 140 कोटी भारतीयांना समर्फितभूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर पीएम मोदींनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, 'भारतीय म्हणून माझ्या आयुष्यातील आजचा दिवस मोठा आहे. प्रत्येक पुरस्कार हा खास असतो, पण जेव्हा एखादा पुरस्कार दुसऱ्या देशाकडून मिळतो, तेव्हा आपले दोन्ही देश योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा आत्मविश्वास दृढ होतो. भारत आणि भूतानमधील संबंध जितके प्राचीन आहेत, तितकेच नवीन आणि समकालीन आहेत. हा पुरस्कार मी 140 कोटी भारतीयांना समर्फित करतो,' असं मोदी यावेळी म्हणाले.
पीएम मोदींच्या गाण्यावर गरबा सादर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यानिमित्त शुक्रवारी भूतानची राजधानी थिम्पू येथे पोहोचले. पारो विमानतळावर पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे हे मोदींच्या स्वागतासाठी आले होते. पारो आंतरराष्ट्रीय विमानतळ ते थिंपू, हा 45 किमी लांबीचा मार्ग भारत आणि भूतानच्या ध्वजांनी सजवण्यात आला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भूतानच्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत केले. राजधानीत पीएम मोदींच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमांमध्ये अनेक सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या गाण्यावर गरबा करण्यात आला.