वॉशिंग्टन: माणसाच्या शरीरातील हृदय हा सर्वात महत्वाचे अंग आहे, याशिवाय माणुस जगूच शकत नाही. एखाद्या व्यक्तीचे हृदय खराब होते, तेव्हा त्याला दुसरी हृदय बसवण्याची गरज असते. पण, अनेकदा हृदय मिळत नाही किंवा मिळण्यास उशीर झाल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. पण, अमेरिकेतील डॉक्टरांनी एक ऐतिहासिक सर्जरी केली आहे. जगात पहिल्यांदाच झालेल्या या सर्जरीत डॉक्टरांनी मानवी शरीरात डुकराचे हृदय बसवले आहे.
ऐकून आश्चर्य वाटला असेल, पण अमेरिकेतील मेरीलँड येथील एका 57 वर्षीय व्यक्तीच्या शरीरात डुकराचे हृदय बसवण्यात आले आहे. जगात पहिल्यांदाच अशाप्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डुकराचे अनुवांशिकरित्या सुधारित हृदय व्यक्तीवर रोपण केले गेले आहे. तीन दिवसांपूर्वी यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता रुग्णाची प्रकृती ठीक आहे. डेव्हिड बेनेट नावाच्या व्यक्तीला हृदयची गरज होती. बरेच प्रयत्न करुनही कुणाचे हृदय न मिळाल्याने डॉक्टरांनी डुकराचे हृदय बसवण्याचा निर्णय घेतला. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, जगात पहिल्यांदाच अशाप्रकारची सर्जरी झाली आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिसीन रिलीझमध्ये, शस्त्रक्रियेपूर्वी बेनेट म्हणाले होते की, 'माझी अवस्था खूप बिकट होती. एका बाजुला माझे मरण आणि दुसऱ्या बाजुला डुकराच्या हृदयचे प्रत्यारोपण, हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. डुकराचे हृदय बसवल्यावर काय होईल मला माहित नव्हते, पण मला जगायची इच्छा असल्यामुळे मी हे हृदय बसवण्याचा निर्णय घेतला.' अमेरिकेतील फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने 31 डिसेंबर रोजी शस्त्रक्रियेसाठी आपत्कालीन मंजुरी दिली होती.
बेनेट यांच्यावर सर्जरी करणारे डॉ. बार्टले पी. ग्रिफिथ यांनी एका निवेदनात म्हटले की, 'प्रत्यारोपणासाठी मानवी हृदय उपलब्ध होत नव्हते, त्यामुळे आम्ही डुकराचे हृदय बसवण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारची ही पहिलीच सर्जरी असल्यामुळे आम्ही सावधगिरी बाळगत आहोत. आम्हाला आशा आहे की, जगातील ही पहिली शस्त्रक्रिया भविष्यात रुग्णांसाठी एक महत्त्वाचा आणि नवीन पर्याय उपलब्ध करून देईल. सर्जरीनंतर आता बेनेट काही दिवस डॉक्टरांच्या निगराणीत राहणार आहेत.