काठमांडू : योगाचे मूळ नेपाळमध्ये आहे. तेव्हा भारत अस्तित्वात नव्हता, असा हास्यास्पद दावा नेपाळचे काळजीवाहू पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी केला आहे. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात आला. त्याच दिवशी ओली यांनी हा दावा केला.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने शर्मा ओली यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते म्हणाले, “योगाची निर्मिती नेपाळमध्ये झाली. योगाला सुरुवात झाली, तेव्हा भारत अस्तित्वात नव्हता. अनेक तुकड्यांमध्ये तो विभागला गेला होता. उत्तराखंड आणि नेपाळ आणि उत्तराखंडच्या भागात योगाची उत्पत्ती झाली होती, असेही केपी शर्मा ओली यांनी म्हटले आहे.
मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगा नेला
आमच्याकडील ऋषीमुनींनी योगाचा शोध लावला होता; मात्र त्यांना आम्ही कधी श्रेय दिले नाही. आमच्याकडील तथ्ये योग्य पद्धतीने आम्ही मांडू शकलो नाही. यातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरातील सर्वांत मोठ्या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवसाला मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्याला मान्यता मिळवून घेतली, असेही ओली म्हणाले.