Osama Bin Laden Killing: तारीख: 2 मे 2011. ठिकाण: अबोटाबाद, पाकिस्तान. लक्ष्य: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ओसामा बिन लादेन... 2011 साली आजच्याच दिवशी अमेरिकन सैन्याने लादेनला त्याच्या घरात घुसून ठार केले. अल कायदाच्या प्रमुखाला मारण्यासाठी अमेरिकन लष्कराने ऑपरेशन नेपच्यून सुरू केले होते. कारवाई दरम्यान अमेरिकेला लादेनच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून बरीच कागदपत्रेही मिळाली. या कागदपत्रांमध्ये त्याने पत्नी, मुलगा, भाऊ, बहीण आणि इतर नातेवाईकांना लिहिलेली पत्रेही आहेत. तिथून मिळालेली कागदपत्रे अमेरिका वेळोवेळी सार्वजनिक करत असते. यापैकी एक बॅच अमेरिकेने 2017 मध्ये सार्वजनिक केली होती, ज्यामध्ये लादेनच्या जवळच्या मित्रांना लिहिलेली पत्रे आहेत. तशातच आता, ओसामाने त्याचा मुलगा हमजा बिन लादेनला एक पत्र लिहिल्याचे स्पष्ट झाले. त्या पत्रात स्पष्टपणे दिसून येते की त्याच्या मृत्यूपूर्वी त्याला आपल्या कुटुंबाला मारले जाईल अशी भीती वाटत होती.
पाकिस्तानात पळून जाण्याचा दिला होता सल्ला
19 जानेवारी 2017 रोजी अमेरिकेने लादेनशी संबंधित 49 वस्तू सार्वजनिक केल्या. यातील एक पत्र हमजाला उद्देशून होते. आपला मुलगा मारला जाईल अशी भीती बिन लादेनला होती, म्हणून तो त्याला पाकिस्तानात पळून जाण्याचा सल्ला देत होता. बिन लादेनने पत्रात लिहिले आहे की-
'प्रिय मुलगा हमजा, अल्लाहचे आशीर्वाद तुझ्यावर असोत. हे ठिकाण लवकरात लवकर सोड. सुरक्षेबाबतच्या गोष्टींवर तुम्ही नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवा. आता तुम्ही हे ठिकाण लवकर सोडून बलुचिस्तानमार्गे कराचीला जाणे अत्यंत आवश्यक आहे. शेख महमूद आणि अल-सिंधी सर्व व्यवस्था करतील. तेथे पोहोचल्यानंतर या क्रमांकावर ८८***** कॉल करा.
खराब हवामानाची वाट पाहा आणि मगच पळा
कराचीमार्गे सुरक्षितपणे पळून जाण्याच्या योजनेचे स्पष्टीकरण देताना, बिन लादेनने आपल्या मुलाला असेही सांगितले की, जर त्याला हवे असेल तर आकाशातून नजर ठेवणाऱ्या ड्रोनच्या नजरा टाळण्यासाठी तो खराब हवामानाची वाट पाहू शकता. एक व्यक्ती तुम्हाला घ्यायला येईल. शक्य असल्यास, आकाशात ढग असताना निघून जा आणि नंबर प्लेट नसलेली कार वापरा. शेख मेहमूद तुम्हाला खालिदचा आयडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स देईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ताबडतोब निघून जावे, तर तसं करा. सुरक्षेची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी सर्व काही लवकरात लवकर करा.
हमजा अबोटाबादमध्ये नव्हता
अमेरिकेच्या सील टीमने पाकिस्तानातील अबोटाबाद येथील घरावर हल्ला केला तेव्हा लादेनच्या तीन बायकांसह संपूर्ण कुटुंब तिथे होते. पण एक व्यक्ती बेपत्ता होती - तो हमजा होता. म्हणजे बिन लादेनला आधीच संशय होता, म्हणून त्याने हमजाला तिथून दूर पाठवले होते. अमेरिकेच्या गुप्तचर खात्याची नजर हमजावर फार पूर्वीपासून होती. 2003 मध्ये त्याच्या दुखापतीच्या बातम्याही आल्या होत्या. पण लादेनच्या पत्रामुळे तो पळून जाण्यात यशस्वी झाला.