ऑनलाइन लोकमत
मुलतान, दि.10- पाकिस्तान आणि रोबोटचा रोजच्या कामात वापर हे शब्द एकत्र वाचले तरी विचित्र वाटेल. पण हे खरंय, पाकिस्तानातील एका रेस्टॉरंटमध्ये एक रोबोटच काम करू लागला आहे. मुलतानमधील एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये राबिया नावाचा एक रोबोट वेट्रेसचं काम करत आहे.
ओसामा जाफरी या अभियंत्याने तयार केलेल्या या रोबोटचे वजन 25 किलो इतके आहे. हा रोबोट एकावेळेस एक पिझ्झा ग्राहकांपर्यंत नेऊ शकतो. साधारण मध्यम उंचीच्या या रोबोटने पांढरा-लाल रंगाचा अॅप्रन परिधान केला आहे. ग्राहकांपैकी कोणा कट्टर व्यक्तीच्या भावना दुखावू नयेत म्हणून ओसामा जाफरी या वेट्रेसच्या गळ्यात एक स्कार्फही अडकवला आहे.
ओसामाच्या वडिलांचे मुलतान शहरामध्ये पिझ्झा डॉट कॉम नावाचे रेस्टॉंरंट असून हा रोबोट येथे काम करु लागल्यापासून मुलतानच्या लोकांनी येथे गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पिझ्झाचा खप दुपटीने वाढल्याचे ओसामा सांगतो. आता तीन नव्या रोबोटसह रेस्टॉरंटची नवी शाखा सुरु करण्याचा ओसामाचा विचार सुरु आहे. त्याचे वडील अझिझ म्हणतात, आधी मी पिझ्झा विकायचो आता लोक माझ्याकडून रोबोट विकत घ्यायला उत्सुक आहेत. या वेट्रेस रोबोटची कल्पना चीनमधील रोबोटचे व्हीडिओ पाहून आल्याचे ओसामा सांगतो. 24 वर्षिय ओसामाने इस्लामाबादच्या नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन अॅंड टेक्नॉलॉजीमधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. राबिया हा पहिला रोबोट तयार करण्यासाठी त्याला 6 लाख रुपयांचा खर्च आला. त्यासाठी त्याने सुटे भाग मुलतानच्या बाजारात उपलब्ध असणारेच वापरले आहेत.
सध्या ओसामाच्या रेस्टॉरंटमध्ये राबिया, अॅनी आणि जेनी हे रोबोट काम करु लागले आहेत. या तिघी आलेल्या पाहुण्यांचे प्रथम स्वागत करतात, त्यांची ऑर्डर घेऊन नंतर पिझ्झा टेबलपर्यंत पोहोचवतात. रोबोटच्या वापरामुळे मुलतानचे लोक भलतेच खुश असून लहान मुलांनाही ते आवडतं.