ऑनलाइन लोकमत
डरबन, दि. ८ - प्रेयसी रिव्हा स्टीनकॅम्पच्या हत्या प्रकरणात दोषी ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा प्रसिध्द धावपटू ऑस्कर पिस्टोरियसला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मागच्याच आठवडयात दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याला सदोष मनुष्यवधाऐवजी हत्येच्या गुन्हयाखाली दोषी ठरवले होते. कनिष्ठ न्यायालयाने ऑस्करला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवले होते. मात्र या शिक्षेला दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
रिव्हाची हत्या केल्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला आता कमीत कमी १५ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. पुढच्यावर्षी १८ एप्रिलला ऑस्करच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. पुढच्यावर्षी सुनावणी होईपर्यंत ऑस्करला त्याच्या काकांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात येणार असून, त्याला आपला पासपोर्ट जमा करावा लागणार आहे. नजरकैदेत असताना त्याला फक्त २० कि.मी.च्या हद्दीत फिरण्याची परवानगी असेल.
दोन वर्षांपूर्वी २०१३ मध्ये व्हॅलेंटाईन्स डे च्या दिवशी ऑस्करने त्याच्या घरी केलेल्या गोळीबारात प्रेयसी रिव्हाचा मृत्यू झाला होता. आपण घरात चोर घुसल्याचे समजून गोळीबार केला. त्यात अनावधानाने रिव्हाचा मृत्यू झाला असा बचाव त्याने केला होता. पॅराऑल्मपिकमध्ये सहा सुवर्णपदके मिळवणा-या ऑस्कर २०१२ लंडन मुख्य ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी झाला होता. शारीरीकदृष्टया अपंग असूनही मुख्य ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणारा तो पहिला धावपटू ठरला होता.