वॉशिंग्टन : चीनसोबतच्या ट्रेड वॉरनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आता जागतीक व्यापार संघटनेलाही (WTO) शिंगावर घेतले आहे. व्यापार संघटनेने स्वत:ला सुधारले नाही, तर अमेरिका या संघटनेतून बाहेर पडण्याचा थेट इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
अमेरिकेची न्यूज एजन्सी ब्ल्यूमबर्गला नुकतीच ट्रम्प यांनी मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी जागतीक व्यापार संघटनेसोबत झालेल्या व्यापार करार हा आतापर्यंतचा सर्वात घाणेरडा करार होता. ट्रम्प यांनी या आधीही व्यापार संघटनेच्या वाद-विवाद सोडविण्याच्या पद्धतीविरोधात टीका केली होती. अमेरिकेने फारत एखादा खटलाच व्यापार संघटनेमध्ये जिंकला असेल. मात्र, गेल्या वर्षीपासून ही परिस्थती बदलली आहे. तेव्हापासून आम्ही जिंकायला सुरुवात केल्याचेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. याचे कारणही ट्रम्प यांनी सांगितले. जर अमेरिका या न्यायालयामध्ये हरली तर बाहेर पडेल अशी संघटनेला भीती वाटत आहे.
डब्ल्यूटीओची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली होती. ही संघटना जागतीक व्यापाराची घडी बसविण्यासाठी आणि देशांमध्ये व्यापारावरून असलेले वाद मिटवून सलोखा ठेवण्यासाठी काम करते. या संघटनेच्या स्थापनेमध्ये अमेरिकेचे मोठे योगदान आहे. 2001मध्ये चीनही या संघटनेचा सदस्य बनले आहे. यास अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिगथायजर यांनी चूक असे संबोधले होते. सध्या चीनसोबत अमेरिकेचे व्यापारयुद्ध सुरु आहे.
अमेरिकेच्या संरक्षणाबाबतच्या धोरणांना महत्व देणाऱ्या ट्रम्प यांनी डब्ल्यूटीओने अमेरिकेवर अन्याय केल्याचा आरेप ठेवला आहे. अमेरिकेने डब्ल्यूटीओच्या नव्या न्यायाधीशांच्या नियुक्यांमध्येही हस्तक्षेप करत ही प्रक्रिया थांबविली आहे. तसेच ट्रम्प यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा त्यांनी कॅनडासमोर अमेरिका आणि मेक्सिकोसोबत सामंजस्य करार करण्य़ासाठी शुक्रवारची डेडलाईन ठेवली आहे.