मनिला : कॅनडाने पाठविलेला कचरा मागे न नेल्यास कशाचीही तमा न बाळगता थेट युद्ध पुकारण्याची धमकीच फिलिपिन्सने दिली आहे. खरेतर 2013 आणि 14 मध्ये कॅनडाने रिसायकल करण्यासाठी कचऱ्याचे काही कंटेनर फिलिपिन्सला पाठविले होते. यामध्ये विषारी कचरा भरला गेल्याचा आरोप फिलिपीन्सने केला आहे.
फिलिपिन्सच्या एका न्यूज पोर्टलने या प्रकरणावर वाचा फोडली होती. कॅनडाने पाच वर्षांपूर्वी जवळपास 100 कंटेनर पाठविले होते. यामध्ये केवळ प्लॅस्टिक असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अबकारीच्या अधिकाऱ्यांना त्यांमध्ये घाणेरडे डायपर आणि किचनमधील कचराही मिळाला होता.
फिलिपिन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी कॅनडाला यावर थेट युद्धाचा इशारा दिला आहे. एका आठवड्यात कॅनडाने त्यांचा अनधिकृत कचरा माघारी न्यावा, अन्यथा कचऱ्याचा डोंगर पाठवून देऊ. फिलिपिन्स आता स्वस्थ बसणार नाही, दोन्ही देशांमध्ये दुश्मनी निर्माण झाली तरी चालेल. आम्ही युद्धाची घोषणा करू. तुम्हाला इच्छा असेल तर हा कचरा तुम्ही खाऊ शकता, अशा शब्दांत त्यांनी कॅनडाला फटकारले आहे.
तसेच दुतेर्ते यांनी प्रशासनाला आदेश देत एक जहाज तयार ठेवण्यासही सांगितले आहे. या जहाजातून कचरा कॅनडाने मागे न्यावा. अन्यथा हा कचरा पुन्हा कॅनडाला पाठविण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया करण्यावरून फिलिपिन्स आणि कॅनडा हे एकमेकांसमोर उभे राहणे जवळपास निश्चित मानले जात आहे. कॅनडाचे म्हणणे आहे की, हा कचरा एका खासगी कंपनीने पाठविलेला होता, खासगी क्षेत्रावर कॅनडा सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. तर तिकडे फिलिपिन्सच्या न्यायालयाने 2016 मध्येच कचरा पाठविणाऱ्यांना त्यांच्या खर्चाने कचरा मागे नेण्याचे आदेश दिले आहेत. मनिलामधील कॅनडाच्या दुतावासाने मवाळ भुमिका घेत दोन्ही देश या प्रकरणी पर्यावरण हितामध्ये राहून उत्तर शोधत आहेत. लवकरच समस्या सुटेल असा आशावाद व्यक्त केला आहे.