वॉशिंग्टन, दि. 22 - सध्या उत्तर कोरिया आणि अमेरिकेमधील वातावरण चांगलंच तापत आहे. एकमेकांना धमक्या दिल्या जात असताना उत्तर कोरियाने अमेरिकेला मोठी धमकी दिली आहे. 'जर तुम्ही आमच्याविरोधात लष्करी कारवाई केली, तर आमचा सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्ब प्रशांत महासागरात टाकू', अशी धमकी उत्तर कोरियाने अमेरिकेला दिली आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री याँग हो यांनी हे वक्तव्य केलं आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उन याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना धमकीची किंमत चुकवावी लागेल असं सांगितल्यानंतर काही वेळानंतर री याँग हो यांनी हे वक्तव्य केलं.
री याँग हो बोलले आहेत की, 'प्रशांत महासागरात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हायड्रोजन बॉम्बस्फोट असेल. कशाप्रकारे ही कारवाई करण्यात येईल याचा निर्णय अद्याप झालेला नाही, कारण किम जाँग उन यांच्या आदेशानंतरच कारवाईला सुरुवात होईल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख उत्तर देण्याचा विचार किम जाँग उन करत आहेत'. री याँग हो संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा मंगळवारी दिला. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली.
‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’
यानंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रंप यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली. ट्रंप यांनी दिलेल्या धमकीबाबत पत्रकारांनी विचारले असता, कुत्रे भुंकत असतात पण हत्ती चालत असतो या म्हणीचा त्यांनी वापर केला. कुत्र्यासारखं भुंकण्याने जर आम्ही घाबरू असं त्यांना वाटत असेल तर ते स्वप्न पाहात आहेत असं यांग हो म्हणाले.
या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. यामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.