अमेरिकेने सोडल्यानंतर अफगाणिस्तान ताब्यात घेण्यास तालिबानी अतिरेक्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानलाच आता भोगावे लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे. सीमावाद, दहशतवाद आणि सार्वभौमत्वाच्या नावाखाली दोन्ही देश लढत आहेत. तालिबानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पाकिस्तानला खुला इशारा दिला आहे.
तालिबानचे जनरल अब्दुल बसीर शेरझादी यांनी पाकिस्तानला धडा शिकविण्याबाबतचा व्हिडीओ जारी केला आहे. इतिहासाकडे पहाल तर आम्ही आमचे संरक्षण करणे जाणतो. प्रत्येक अफगानी नागरिक पाकिस्तानचा तिरस्कार करतो. पाकिस्तानने कायद-ए-आझम जिना यांचे नाव बदलावे, ते इंग्रजांच्या नशेत होते. केवळ पैगंबर मोहम्मद कायदे आझम आहेत. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद आहे पण तिथे इस्लामिक काहीच नाहीय, अशा शब्दांच टीका केली आहे.
पाकिस्तानने अमेरिकेला त्यांचे हवाई क्षेत्र वापरण्यास दिले आहे. यामुळे देखील तालिबान भडकला आहे. अफगाणिस्तानला ५ हजार वर्षांचा इतिहास आहे. तुम्ही आमच्यावर हल्ला केल्यास आमचे आत्मघाती हल्लेखोर तुमच्याशी लढायला तयार आहेत. आमच्याकडे हजारो आत्मघातकी बॉम्बर्स आहेत जे तुमची घरे उद्ध्वस्त करतील. आम्ही इस्लामाबादला आमची दुसरी राजधानी बनवू. सापाचे चुंबन घ्यायला गेलात तर सापच तुम्हाला चावेल, असा कडक शब्दांत इशारा दिला आहे.
तालिबानचा हा जनरल अफगाणिस्तानातील टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. त्याने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानवर टीका केली होती. पाकिस्तान मुद्दाम आमच्या फळांची निर्यात करण्यास उशीर करत असतो. यापुढे आम्हाला कराची किंवा ग्वादर बंदराची गरज भासणार नाही. अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमिरातीने चाबहार बंदर वापरण्यासाठी इराणसोबत करार केला आहे, असे म्हटले होते.
ड्युरंड रेषा दोन्ही देशांमधील सीमारेषा म्हणून ओळखली जाते. परंतू, तालिबान ती मानण्यास तयार नाही. पाकिस्तानचे खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान हे भाग त्यांचे असल्याचे तालिबानचा दावा आहे. पाकिस्तान ते मानण्यास तयार नाही. पाकिस्तान ड्युरंड रेषेवर कुंपण घालत आहे, यामुळे तालिबान या पाकिस्तानी प्रयत्नांवर वेळोवेळी हल्ले देखील करत आला आहे.