क्वालालंपूर- मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नजीब यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मलेशियन जनतेने नाकारले. नजीब यांनी यूएमएनओ पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी बॅरिसन नॅशनल आघाडीच्या नेतेपदाचाही राजीनामा दिली आहे.मलेशियामध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत रजाक यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. त्याबद्दल बोलताना रजाक बुधवारी म्हणाले होते, ' जे झालं ते अत्यंत दुःखदायक आहे मात्र लोकशाहीच्या तत्वांना अनुसरुन एक पक्ष म्हणून हा निकाल स्वीकारावा लागेल'. मजीब आणि त्यांची पत्नी रोस्माह मॅन्सोर यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आलेली आहे.नजीब यांचा पराभव 92 वर्षांचे मलेशियन नेते महाथिर मोहंमद यांनी केला. ते लोकशाही पद्धतीने निवडून येणारे जगातील सर्वात वयोवृद्ध नेते आहेत. नजीब यांनी मलेशियात 1 मलेशिया डेव्हलपमेंट बर्हार्ड (1एमडीबी ) योजनेत कोट्यवधी डॉलर्सचा भ्रष्टाचार केला असे सांगण्यात येते. महाथिर याबाबत बोलताना म्हणाले होते, ''आम्ही नजीब यांचा राजकीय सूड वगैरे घेण्याच्या विचारात नाही तर आम्ही कायद्याचे राज्य स्थापन करणार आहोत, जर नजीब यांनी काहीतरी चुकीचं केल्याचं कायद्याद्वारे सिद्ध झालं तर त्यांना परिणाम भोगावेच लागतील.'' नजीब आणि त्यांच्या पत्नीवर देश सोडण्याची मनाई केल्यानंतर नजीब यांनी ट्वीट करुन आपण सरकारच्या निर्णयाचा आदर करतो असे म्हटले आहे.
नजीब रजाक यांना देश सोडण्यास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 3:36 PM