वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडलं आहे. थोड्याच वेळात ज्यो बायडन राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. ट्रम्प अध्यक्षपद सोडण्यास फारसे उत्सुक नव्हते. त्यांच्या समर्थकांनी संसद परिसरात गोंधळ घातला होता. मात्र अखेर ट्रम्प यांनी पराभव मान्य केला. ट्रम्प नवनिर्वाचित अध्यक्ष बायडन यांच्या शपथविधीला उपस्थित राहणार नसल्यानं ते व्हाईट हाऊस सोडताना नेमकं काय बोलणार याची उत्सुकता होती.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून केलेलं शेवटचं भाषण वेगळं ठरलं. ट्रम्प यांनी भाषण करताना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लिहिलेल्या भाषणाचा आधार घेतला नाही. ट्रम्प यांनी शेवटच्या भाषणात चीनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. त्यांनी नाव न घेता नवनियुक्त अध्यक्ष ज्यो बायडन यांनी शुभेच्छा दिल्या. आपण लवकरच पुन्हा येऊ, असं ट्रम्प त्यांच्या शेवटच्या भाषणात म्हणाले.देशाचा ४५ वा अध्यक्ष होणं माझ्यासाठी गौरवास्पद बाब होती, असं ट्रम्प व्हाईट हाऊस सोडताना म्हणाले. मागील चार वर्षे अविश्वसनीय होती. आपण सोबत येऊन अनेक गोष्टी मिळवल्या. इतर देशांच्या तुलनेत आपण कोरोना संकटाचा मुकाबला अतिशय चांगल्या प्रकारे केला. आपण जे केलं त्याला वैद्यकीय चमत्कार म्हणता येईल. आपण अवघ्या ९ महिन्यांत कोरोनावरील लस तयार केली, असं ट्रम्प म्हणाले. अध्यक्ष पदावरून पायउतार होताना त्यांनी कोरोना विषाणूचा उल्लेख चायना विषाणू असा करत चीनवर निशाणा साधला.बायडन यांच्या नावाचा उल्लेख टाळलाट्रम्प यांनी बायडन प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. मात्र त्यांनी बायडन यांचं नाव घेणं टाळलं. उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी त्यांच्याकडे चांगला पाया आहे, असं ट्रम्प म्हणाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभव ट्रम्प यांनी बरेच दिवसांनंतर मान्य केला. त्यानंतर त्यांनी बायडन यांच्या शपथविधीला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील बऱ्याच नागरिकांना ट्रम्प यांची ही वर्तणूक खटकली आहे.